अनिल भंडारी
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेला चांगला प्रतिसाद दिला असून, तब्बल ३ हजार ३०६ शेतकऱ्यांनी हमी दराने ८४ हजार ३९० क्विंटल मालदांडी ज्वारी विक्री करून २८ कोटी ८६ लाख रुपयांचा लाभ मिळवला आहे. (Jowar Kharedi)
हमी दराने खरेदीला जोरदार प्रतिसाद
राज्य शासनाने १ मे २०२५ पासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भरडधान्य खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. सुरुवातीला ३० जूनपर्यंत खरेदी सुरु होती, त्यानंतर ही मुदत वाढवून ३१ जुलैपर्यंत करण्यात आली. या कालावधीत बीड, चौसाळा, माजलगाव, शिरूर, वडवणी, गेवराई, पाटोदा आणि युसुफ वडगाव या ८ केंद्रांवर खरेदी व्यवस्था कार्यान्वित होती.
खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी आणि सहभाग
२ ते ३० एप्रिल, तसेच ३१ मे ते १५ जून या कालावधीत ४ हजार ९४९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी ४ हजार ९३७ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे वेळ आणि केंद्राबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ३ हजार ३०६ शेतकऱ्यांनी माल प्रत्यक्ष खरेदी केंद्रांवर आणून विक्री केली.
खरेदीचा तपशील
२८ जुलैपर्यंत: २,८८९ शेतकऱ्यांकडून ७४,५१९ क्विंटल भरडधान्याची खरेदी
२९ जुलै: १७६ शेतकऱ्यांकडून ३,९८० क्विंटल खरेदी
३० जुलै: २४१ शेतकऱ्यांकडून ५,८६८ क्विंटल खरेदी
३१ जुलै: खरेदीची शेवटची तारीख
गोदामात साठवणूक व प्रक्रिया
एकूण खरेदी केलेल्या ८४ हजार ३९० क्विंटल ज्वारीपैकी ६४ हजार ६९९ क्विंटल धान्य गोदामात जमा करण्यात आले असून उर्वरित १९ हजार ६९१ क्विंटल ज्वारीची साठवण प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना निश्चित ३ हजार ४२१ रुपये प्रतिक्विंटल हमी दर मिळाला आहे.
१ मे ते ३१ जुलैपर्यंत खरेदी प्रक्रियेचा अवधी होता. एकूण ८ केंद्रांवर ३० जुलैपर्यंत ८४ हजार ३९० क्विंटल भरडधान्य ज्वारीची खरेदी झाली. शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. - एच. डी. भोसले, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीड.
महत्त्वाच्या आकडेवारी
तपशील | आकडे |
---|---|
खरेदी केलेली ज्वारी | ८४,३९० क्विंटल |
खरेदीची रक्कम | २८,८६,९८,१९० रु. |
गोदामात जमा | ६४,६९९ क्विंटल |
साठवण प्रक्रिया सुरू | १९,६९१ क्विंटल |
हमी दर | ३,४२१ रु. प्रति क्विंटल |
शेतकरी सहभागी | ३,३०६ |