Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Market : हरभरा तयार, पण हमीभावाचे संरक्षण केव्हा? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:23 IST

Harbhara Market : यंदा उत्पादन चांगले होण्याची शक्यता असतानाच हरभऱ्याचे दर अचानक घसरले आहेत. खासगी बाजारात हरभरा पाच हजारांवर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं असून हमीभाव फक्त कागदावरच राहतोय का, असा सवाल उपस्थित होत आहे. (Harbhara Market)

Harbhara Market : रब्बी हंगाम सुरू होण्याआधीच हरभऱ्याच्या दरांनी शेतकऱ्यांना धक्का दिला आहे. जमिनीत मुबलक आर्द्रता आणि अनुकूल वातावरणामुळे यंदा हरभऱ्याच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाली असताना, दुसरीकडे खासगी बाजारात हरभऱ्याचे दर थेट पाच हजार रुपयांवर घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. (Harbhara Market)

सध्या बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या तुलनेत ५०० ते ७०० रुपयांनी कमी दर मिळत असून व्यापाऱ्यांनी संगनमताने दर पाडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.(Harbhara Market)

यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे सरासरीपेक्षा अधिक क्षेत्र झाले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात सुमारे ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली असून हे क्षेत्र एक लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. 

पहिल्या टप्प्यात पेरलेला हरभरा सध्या बहरावर असून काही ठिकाणी घाटे पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत.

पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जमिनीत निर्माण झालेली आर्द्रता जिरायती हरभऱ्यासाठी अत्यंत पोषक ठरली आहे. त्यातच वातावरण उबदार राहिल्यामुळे हरभऱ्याची वाढ जोमात असून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, हंगाम सुरू होण्यापूर्वीच दर घसरल्याने या अपेक्षांवर पाणी फेरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हमीभाव जाहीर; प्रत्यक्षात कमीच दर

केंद्र शासनाने यंदा हरभऱ्यासाठी हमीभावात २१० रुपयांची वाढ करत ५ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ४ हजार ६५० ते ५ हजार १५० रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हमीभाव जाहीर करूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

आयातमुक्त धोरणाचा बसला फटका

केंद्र शासनाच्या ड्यूटी फ्री आयातमुक्त धोरणामुळे (२०२४–२५) देशात पिली मटर आणि मसूर डाळीची मोठ्या प्रमाणात आयात झाली आहे. 

या डाळी हरभऱ्याच्या डाळीचा पर्याय म्हणून वापरल्या जात असल्याने देशांतर्गत हरभऱ्याच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी हरभऱ्याच्या दरांवर दबाव निर्माण झाला असून भाव घसरल्याचे जाणकारांचे मत आहे.

कॅनडा, रशिया आणि ऑस्ट्रेलियामधून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आयात होते. यंदा आयातीवर १० टक्के शुल्क लावण्यात आले असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप बाजारात दिसून येत नसल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

हरभऱ्याचे सध्याचे बाजारभाव (रु. प्रति क्विंटल)

२४ डिसेंबर: ४ हजार ८०० ते ५ हजार १५०

३१ डिसेंबर: ४ हजार ६५० ते ५ हजार २००

२ जानेवारी: ४ हजार ७०० ते ५ हजार १६५

५ जानेवारी: ४ हजार ६५० ते ५ हजार १५०

सध्या हरभऱ्याची आवक कमी असून प्रतवारीही फारशी चांगली नसल्याने दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र, हंगाम जसजसा पुढे जाईल तसतशी आवक वाढण्याची शक्यता असल्याने दर आणखी दबावात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

गतवर्षीपेक्षा परिस्थिती वेगळी

गतवर्षी हंगामात हरभऱ्याला ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. यंदा मात्र आयात धोरण, बाजारातील मागणी आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे दराबाबत अनिश्चितता कायम आहे.

सध्या हरभऱ्याची आवक कमी असून प्रतवारीही समाधानकारक नाही. त्यामुळे दरात चढ-उतार होत आहेत. यंदा दर काय पातळीवर स्थिरावतील, हे आत्ताच सांगता येणार नाही. - अमर बांबल, अडते, बाजार समिती, अमरावती

शेतकऱ्यांची मागणी

हरभऱ्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

अन्यथा उत्पादन खर्चही न निघाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kapus Bajarbhav : कापूस बाजारात चैतन्य; आयात शुल्क लागू होताच दरात किती झाली सुधारणा? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Chickpea Prices Crash Before Season; Where is MSP Protection?

Web Summary : Chickpea farmers in Amravati face distress as prices fall below MSP despite good yields. Duty-free imports of peas and lentils are blamed. Traders anticipate price control with a 10% import duty, while farmers await government intervention to protect their income.
टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड