गणेश घ्यार
सणासुदीचा काळ आणि खरीप हंगाम सुरू असतानाच हळद व्यापारी व अडत्यांनी विविध मागण्यांसाठी २२ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे बाजारपेठेत हळदीची खरेदी पूर्णपणे ठप्प झाली असून, शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. (Halad Market)
हळद हातात असूनही विक्रीचा मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Halad Market)
गावोगाव शेतकरी किरकोळ व्यापाऱ्यांना हळद विकून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत; पण त्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त असून शासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (Halad Market)
पावसामुळे हळदीवर बुरशी
आठवडाभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची हळद भिजली आहे. घरात साठवलेल्या हळदीवर बुरशी चढत असून ती पांढरी पडत आहे. याशिवाय दमट वातावरणामुळे हळदीला कीड लागण्याची भीतीही निर्माण झाली आहे. एकीकडे व्यापाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे पिकावर रोगराई यामुळे शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.
हळदीच्या दरातील चढ-उतार
एप्रिल-मे महिन्यात हळदीला १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.
मात्र जास्त आवक झाल्याने शेतकरी विक्री करू शकले नाहीत.
जून ते ऑगस्ट दरम्यान हळदीचा दर घसरून ११ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल झाला.
पोळ्यानंतर चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हळद थांबवली; पण आता संपामुळे संकट अधिक गडद झाले आहे.
बाजारात हळद आणावी तरी कुणाला? व्यापारी व अडत्यांनी संप पुकारल्याने आम्ही कोंडीत सापडलो आहोत. शासनाने सोयाबीनप्रमाणे हळदीलाही हमीभाव द्यायला हवा.- एकनाथ घ्यार, शेतकरी
एप्रिल-मे मध्ये १४ हजारांचा दर होता; पण आम्ही विक्री केली नाही. आता हळदीवर बुरशी चढत आहे. शासनाने किमान १४ हजार रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, अन्यथा आमचे मोठे नुकसान होईल.- समाधान टापरे, शेतकरी
खरीप हंगाम सुरू असतानाच व्यापारी व अडत्यांच्या संपामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दमट वातावरणामुळे हळदीवर बुरशी चढत असून ती साठवणे कठीण झाले आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांचा संप मिटवावा तसेच शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशी मागणी वाढू लागली आहे.