Join us
Daily Top 2Weekly Top 5

Halad Market : हळद दरवाढीचा ट्रेंड! पिवळ्या सोन्याला पुन्हा आला भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:20 IST

Halad Market : गेल्या काही आठवड्यांपासून स्थिर असलेल्या हळदीच्या दरांमध्ये अखेर तेजी दिसून आली आहे. हिंगोली बाजारात दर्जेदार हळदीला वाढती मागणी मिळाल्याने दरात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची उसळी नोंदवली गेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Halad Market)

हिंगोली : मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी–विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या 'पिवळ्या सोन्या'ला अखेर भाववाढीची झळाळी मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. (Halad Market)

१७ डिसेंबर रोजी हळदीच्या दरात क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Halad Market)

गेल्या काही आठवड्यांपासून हळदीचे दर स्थिर होते. उत्पादन खर्च, मजुरी तसेच खत-औषधांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. (Halad Market)

भाववाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी हळदीची विक्री थांबवली होती. मात्र, बाजारात अचानक मागणीत वाढ झाल्याने तसेच दर्जेदार हळदीची आवक वाढल्याने दरात सुधारणा झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.(Halad Market)

बुधवारी एक हजार क्विंटल हळदीची आवक

बुधवारी बाजारात मध्यम ते उत्तम प्रतीच्या हळदीची सुमारे एक हजार ते एक हजार १०० क्विंटल इतकी आवक झाली होती. बोटा, सेलम, राजापुरी आदी प्रकारच्या हळदीला चांगला प्रतिसाद मिळाला. काही दर्जेदार हळदीला अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसून आले.

दरात सातत्याने सुधारणा

गेल्या काही दिवसांतील हळदीच्या किमान दरांवर नजर टाकली असता सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.१० डिसेंबर रोजी किमान दर १२,४०० रुपये होता.११ व १२ डिसेंबर रोजी तो १२,५०० रुपये राहिला.१५ डिसेंबरला १२,७०० रुपये,तर १६ डिसेंबर रोजी किमान दर १२,८०० रुपयांपर्यंत पोहोचला.

कमाल दरांमध्येही वाढ दिसून आली असून १४ हजार ९०० ते १५ हजार ६०० रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची नोंद आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची उसळी मिळाल्याने साठवून ठेवलेली शिल्लक हळद आता विक्रीसाठी बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे. वधारलेले भाव टिकून राहिल्यास येत्या काही दिवसांत बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हंगाम संपल्याने आवक घटली

मार्केट यार्डात मार्च-एप्रिलपासून नव्या हळदीची आवक सुरू होते. हंगामाला सुमारे नऊ महिने पूर्ण झाल्याने सध्या हळदीची आवक कमी झाली आहे. 

हंगामाच्या काळात सरासरी चार ते पाच हजार क्विंटलची आवक होत असते. मात्र, सध्या दररोज साधारण एक हजार क्विंटलच हळद बाजारात येत आहे. बुधवारी एक हजार १०० क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली.

एकूणच, मागणी वाढ, दर्जेदार मालाची आवक आणि मर्यादित पुरवठा यामुळे हळदीच्या दरात सुधारणा होत असून, 'पिवळ्या सोन्या'ला पुन्हा एकदा भाववाढीची झळाळी मिळाल्याचे चित्र हिंगोली बाजारात पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये 'तेजी'; क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची वाढ वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric Market Surge: Yellow Gold Prices Rise Again in Hingoli

Web Summary : Hingoli's turmeric market sees a price surge, offering relief to farmers. Prices rose by ₹400-500/quintal. Increased demand and quality boosted rates after a period of stability. Arrivals were around 1100 quintals, with further increases expected if prices hold.
टॅग्स :शेती क्षेत्रपीकबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड