Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv Grapes Export : धाराशिवची द्राक्षे थेट रशिया-युरोपमध्ये; शेतकऱ्यांना मिळतोय जबरदस्त दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:18 IST

Dharashiv Grapes Export : युरोप व रशियामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने धाराशिव जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा चांगला दर मिळत आहे.गेल्या काही वर्षांत द्राक्ष लागवड वाढल्याने जिल्हा द्राक्ष निर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहे.(Dharashiv Grapes Export)

चेतन धनुरे

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यंदा द्राक्षांना चांगला दर मिळत असल्याने धाराशिव जिल्ह्यातील द्राक्षे मोठ्या प्रमाणात विदेशवारी करत आहेत. (Dharashiv Grapes Export)

कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातून दरवर्षी सरासरी सुमारे १३०० टन द्राक्षांची निर्यात होत आहे. (Dharashiv Grapes Export)

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बहुतांश द्राक्षे रशिया आणि युरोपीय देशांमध्ये निर्यात होत असल्याने सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण–इस्रायल युद्धाचा या निर्यातीवर फारसा परिणाम झालेला नाही.(Dharashiv Grapes Export)

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत द्राक्ष लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. विशेषतः तुळजापूर तालुका हा जिल्ह्यातील प्रमुख ग्रेप झोन म्हणून ओळखला जात आहे. या एकट्या तालुक्यातून जिल्ह्यातील एकूण निर्यातीपैकी जवळपास ९० टक्के द्राक्षे विदेशात पाठवली जातात.(Dharashiv Grapes Export)

नैसर्गिक अडचणींवर मात

मागील तीन-चार वर्षांत नैसर्गिक आपत्ती, रोगराई आणि हवामानातील बदलांमुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाला होता. तरीही शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि काळजीपूर्वक लागवड करून निर्यातक्षम दर्जाची द्राक्षे तयार केली. त्यामुळे मागील तीन वर्षांत सरासरी १,३०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

आखाती देशांत केवळ ५ टक्के निर्यात

धाराशिव जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांपैकी जवळपास ९५ टक्के माल रशिया आणि युरोपियन देशांत जातो. तर आखाती देशांमध्ये केवळ ५ टक्केच द्राक्षांची निर्यात केली जाते. त्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झालेला नाही.

स्थानिक बाजारातही चांगली मागणी

निर्यातीसोबतच स्थानिक बाजारपेठेतही धाराशिवच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे. पुणे, मुंबई, सोलापूर आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येथून द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर पाठवणी केली जाते.

सध्या शेतकरी जागेवर सरासरी १०० रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षांची विक्री करत आहेत. तर निर्यातक्षम दर्जाच्या द्राक्षांना ११० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक महादेव चडणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बहुतांश द्राक्षे युरोप आणि रशियाला निर्यात होतात. आखाती देशांकडे जाणारी निर्यात अत्यल्प आहे. त्यामुळे सध्याच्या युद्धाचा थेट परिणाम द्राक्षांवर होणार नाही.

काही जणांकडून युद्धाची भीती दाखवून द्राक्षांचे दर पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून कमी दरात माल विकू नये, असे आवाहन त्यांनी केले.

चांगला दर आणि निर्यातक्षम दर्जामुळे यंदा धाराशिव जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Export : युद्धाचा हळद बाजारावर परिणाम; हजारो टन माल बंदरात अडकला वाचा सविस्तर

अधिक वाचा : Onion Export : कंटेनर रवाना झाला, पण अचानक मध्यपूर्वेत तणाव; कांदा निर्यातीवर ब्रेक वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv Grapes Export Booming: Farmers Get Excellent Rates in Russia, Europe

Web Summary : Dharashiv grapes are in high demand in Russia and Europe, fetching farmers excellent prices. Despite Middle East tensions, exports remain strong, primarily from Tuljapur. Farmers' efforts overcame weather challenges, ensuring export-quality grapes. Local markets in Pune and Mumbai also show good demand.
टॅग्स :शेती क्षेत्रद्राक्षेशेतकरीशेती