Join us

Dalimb Export : भारतीय डाळिंबाची पहिली पेटी समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला पोहचली, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:44 IST

Dalimb Export : भगवा डाळिंबाची भारतातील (Pomegranate Export) पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली.

Dalimb Export :  भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत, कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात APEDA च्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा डाळिंबाची (Pomegranate Export) भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.

ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबांच्या निर्यातीसाठी (Dalimb Export) बाजारपेठ उपलब्ध झाल्यानंतर, फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाला डाळिंबांच्या निर्यातीसाठी एक कार्य योजना व मानक कार्यपद्धती (SOP) वर स्वाक्षरी करण्यात आली. APEDA व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटनेने (NPPO) यशस्वी बाजारपेठ प्रवेश सुविधा दिल्यानंतर, जुलै 2024 मध्ये पहिली हवाई वाहतूक करण्यात आली. हवाई वाहतुकीमुळे बाजारपेठेतील मागणीचे मूल्यांकन करण्यास मदत झाली, जेणेकरून वाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने समुद्री शिपमेंट कशी करता येईल, याचा पाठपुरावा करण्यात आला.

महाराष्ट्रातील सोलापूर भागातून आणलेल्या 5.7 मेट्रिक टन (MT) डाळिंबांसह, पहिली समुद्री मालवाहतूक 6  डिसेंबर 2024 रोजी भारतातून निघाली आणि 13 जानेवारी 2025 रोजी सिडनीला पोहोचली. या डाळिंबाची वाहतूक 1,900 बॉक्समध्ये/डब्यांमध्ये पॅक करण्यात आली होती, प्रत्येक डब्यात 3 किलो उच्च दर्जाची फळे होती. भगवा जातीचे 1872 बॉक्स (6.56 टन) वाहून नेणारी आणखी एक व्यावसायिक समुद्री शिपमेंट 6 जानेवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे पोहोचली.

मोठ्या प्रमाणात समुद्री शिपमेंटच्या वापरामुळे स्पर्धात्मक किंमत खात्रीशीर झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला व शाश्वत व्यापार संधी निर्माण झाल्या. दोन्ही शिपमेंट्स ANARNET मध्ये एकत्रित करण्यात आल्या. ही भारताची ट्रेसेबिलिटी सिस्टम आहे, ज्यामुळे पारदर्शकता खात्रीची झाली व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला.

डाळिंबाची खेप पोचल्यावर, सिडनी, ब्रिस्बेन व मेलबर्नमध्ये त्यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जोरदार मागणीमुळे आधीच अतिरिक्त शिपमेंटसाठी तात्काळ मागण्या नोंदविण्यात आल्या आहेत. यातून भारत व ऑस्ट्रेलियामधील फायदेशीर तसेच शाश्वत व्यापार संबंधांची वाढती क्षमता दिसून येते आहे. मालवाहतुकीची वेळ ऑस्ट्रेलियाच्या उत्पादन नसलेल्या हंगामाशी धोरणात्मकरित्या जुळवून घेण्यात आली होती, जेणेकरून भारतीय निर्यातदारांसाठी बाजारपेठेतील संधी जास्तीतजास्त असतील याची खात्री झाल्याचे सांगण्यात आले.

डाळिंबात निर्यातीत वाढ 

APEDA चे अध्यक्ष अभिषेक देव म्हणाले की, “भारताचा कृषी निर्यातीचा लँडस्केप अभूतपूर्व वेगाने वाढत आहे, ताज्या फळांच्या निर्यातीत वर्षानुवर्षे 29 टक्के वाढ होत आहे’. केवळ डाळिंबात (निर्यातीत) 20 टक्के वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाला प्रीमियम डाळिंबाची यशस्वी निर्यात ही भारताची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च दर्जाचे ताजे उत्पादन पुरवण्याची क्षमता दर्शवत असून यामुळे जगभरातील ग्राहकांचा विश्वास वाढतअसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती