शरद मिरे
काळ्या मातीतले 'पांढरे सोने' म्हणून ओळखला जाणारा कापूस यंदा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.(Cotton Market)
दोन-तीन वर्षांपूर्वी १२ ते १४ हजार रुपयांचा विक्रमी टप्पा गाठणारा कापूस सध्या ७ ते ८ हजारांच्या घरात स्थिरावल्याने कापूस उत्पादकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.(Cotton Market)
उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव घसरल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
मार्केट यार्डातील स्थिती
भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.
सुरुवातीला प्रति क्विंटल ६,६७१ ते ७,१५१ रुपये असा दर मिळाला. गत बुधवारी (१९ फेब्रुवारी) रोजी दर ७ हजार ७५० रुपयांपर्यंत पोहोचला असला, तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा तो अत्यंत कमी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या हंगामात आतापर्यंत सुमारे ३५ हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे.
मागील वर्षी याच कालावधीत ५५ हजार ७९७ क्विंटल आवक नोंदली गेली होती आणि दर ६ हजार ८०० ते ७ हजार ३२५ रुपयांच्या दरम्यान होते. म्हणजेच, यंदा आवकही कमी आणि भावातही विशेष सुधारणा नाही.
२०२१-२२ चा सुवर्णकाळ आता दूर
२०२१-२२ हंगामात कापसाला १२ ते १४ हजार रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची दारे उघडली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून दर घसरतच आहेत.
उत्पादन खर्च, मजुरी, कीडनाशके आणि खतांचे वाढलेले दर यामुळे खर्च प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत सध्याचा बाजारभाव कष्टाच्या मोबदल्याला न्याय देत नसल्याचे शेतकरी सांगतात.
विकायचा की साठवून ठेवायचा?
सध्याच्या दरात कापूस विकल्यास वर्षभराचे गणित कोलमडते; पण भाववाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवला तर घरखर्च, कर्जाची परतफेड आणि मुलांचे शिक्षण यांची तजवीज कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे. कृषी केंद्रांची उधारी, दैनंदिन खर्च आणि बँक कर्जाचा ताण यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत.
शेतकऱ्यांची व्यथा
माझ्या पाच एकरात डोलणारा कापूस आता स्वप्न झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कापूस सोडून मिरची आणि सोयाबीनकडे वळलो. भावच मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय? - आशिष मोहड, शेतकरी, मेढा
पांढऱ्या सोन्याला सन्मानजनक भाव मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
आर्थिक कोंडी
उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडत आहे.
'पांढरं सोनं की उरफाटा फास?' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. योग्य दर न मिळाल्यास पुढील हंगामात कापसाखालील क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कापूस हा विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रमुख नगदी पीक मानला जातो. मात्र दरातील मोठी घसरण आणि अनिश्चित बाजारपेठ यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
किमान हमीभाव, बाजार हस्तक्षेप आणि साठवणुकीसाठी आर्थिक मदत यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवल्या गेल्या नाहीत, तर 'पांढऱ्या सोन्याची' झळाळी कायमची हरवण्याची भीती व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : Cotton Market : टॅरिफ करारानंतर कापूस घसरला; बाजारात काय घडतंय? वाचा सविस्तर
Web Summary : Cotton farmers in Vidarbha are struggling with falling prices and rising production costs. Faced with financial strain, they are unsure whether to sell their crop now at low rates or wait for potential price increases, risking further economic hardship.
Web Summary : विदर्भ में कपास किसान गिरती कीमतों और बढ़ती उत्पादन लागत से जूझ रहे हैं। वित्तीय तनाव का सामना करते हुए, वे अनिश्चित हैं कि अपनी फसल को कम दरों पर अभी बेचें या संभावित मूल्य वृद्धि की प्रतीक्षा करें, जिससे आगे आर्थिक कठिनाई हो सकती है।