अमरावती : कापसाला 'पांढरे सोने' म्हटले जाते, आणि यंदा ते खरोखरच चकाकताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम कापूसबाजारावर होत असून, प्रथमच कापसाचे दर ८,४०० ते ८,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
मात्र, या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे क्रूड ऑईलचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी पॉलिस्टर निर्मिती महाग झाली असून, त्याचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
पॉलिस्टर महागल्याने वस्त्रोद्योगात कापसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे रुईच्या गाठींना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी निर्माण झाली आहे.
सुमारे दीड महिन्यापूर्वी ६१ सेंट प्रति पाऊंड असलेले रुईचे दर आता ७६ ते ७७ सेंट प्रति पाऊंडपर्यंत पोहोचले आहेत. याचबरोबर रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलर ९३ रुपयांच्या पुढे गेल्याने निर्यातीसाठीही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशांतर्गत बाजारात तेजी, पण आवक कमी
या सर्व घडामोडींमुळे देशांतर्गत कापसाच्या दरात वाढ झाली असली, तरी बाजारात कापसाची आवक अत्यंत कमी आहे.
बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दरात कापूस विकला असून, सध्या त्यांच्या जवळ साठा नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असला, तरी ते आणखी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणूक करून आहेत.
सध्या बाजारात येणारा कापूस हा मुख्यतः व्यापाऱ्यांकडील असल्याचे चित्र आहे. कमी भावात खरेदी केलेला कापूस आता जास्त दराने विक्रीसाठी आणला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
अपेक्षित दरापेक्षा अजूनही कमी?
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, डॉलरचा वाढलेला दर आणि कच्च्या तेलाची टंचाई यांचा विचार करता कापसाचे दर किमान ८,७०० ते ८,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचायला हवेत. मात्र सध्याचे दर त्यापेक्षा कमी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शेतमाल दर अभ्यासक पवन देशमुख म्हणाले की, 'सध्याच्या परिस्थितीत कापसाचे दर काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे.'
सोयाबीनलाही तेजीचा आधार
कापसाबरोबरच सोयाबीनच्या दरातही तेजी दिसून येत आहे. तेल आणि सोयापेंडच्या दरवाढीमुळे सोयाबीनला मागणी वाढली आहे.
अमरावती बाजार समितीत सोयाबीनला ५,१०० ते ५,४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, येथेही कापसाप्रमाणेच शेतकऱ्यांकडे साठा नसल्याने आवक कमी आहे.
कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांच्या दरात तेजी असली, तरी शेतकऱ्यांच्या हाती माल नसल्याने या वाढीचा थेट फायदा त्यांना मिळत नाही.
बाजारातील सध्याची परिस्थिती ही व्यापाऱ्यांसाठी अनुकूल ठरत असून, शेतकरी मात्र या तेजीपासून दूरच राहत असल्याचे वास्तव आहे.
अधिक वाचा : Pik Vima Yojana : शेतकऱ्यांच्या पैशावर विमा कंपन्या मालामाल; ९ वर्षांत कमावले हजारो कोटी