Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cotton Market : टॅरिफ करारानंतर कापूस घसरला; बाजारात काय घडतंय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:34 IST

Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ११ टक्के आयात शुल्क लागू झाल्यानंतर दर ८ हजार २०० रुपयांपर्यंत गेले होते; मात्र टॅरिफ करारानंतर बाजारावर दबाव वाढला आहे. दरघटीसोबतच यंदा उत्पादनही कमी आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. 'सीसीआय'(CCI) खरेदीला मुदतवाढ मिळणार का? वाचा सविस्तर (Cotton Market) 

Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 'पांढरे सोने' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली असून सध्या बाजारभाव ७ हजार ५०० रुपयांच्या आसपास स्थिरावले आहेत.(Cotton Market)

दरात सुमारे ५०० रुपयांची घट झाल्याने आणि यंदा उत्पादनही कमी झाल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत.(Cotton Market)

आयात शुल्क आणि टॅरिफ कराराचा परिणाम

केंद्र शासनाने १ जानेवारीपासून कापसावरील ११ टक्के आयात शुल्क पूर्ववत लागू केल्याने देशांतर्गत बाजारात कापसाला चांगला उठाव मिळाला होता. त्या काळात दर ८०० ते १००० रुपयांनी वाढून ८,२०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

मात्र फेब्रुवारीत अमेरिकेसोबत टॅरिफ करार झाल्यानंतर परदेशातून कापसाची आवक वाढली. त्यामुळे देशांतर्गत मागणी कमी झाली आणि दर पुन्हा दबावात आले. सध्या अनेक बाजार समित्यांत कापूस ७,३०० ते ७,६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

उत्पादन घटल्याने अपेक्षाभंग

यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि काही भागांत अतिवृष्टी झाल्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले. याशिवाय गुलाबी बोंडअळी व बोंडसळ यांचा प्रादुर्भाव वाढल्याने सरासरी उत्पादनात घट झाली. अनेक शेतकऱ्यांना दोन ते तीन वेच्यातच पिकाची उलंगवाडी करावी लागली.

उत्पादन कमी आल्यामुळे दर वाढतील, अशी अपेक्षा होती; मात्र आयात धोरणातील बदलामुळे ही अपेक्षा फोल ठरली.

अलीकडील कापूस बाजारभाव (रु./क्विंटल)

२७ जानेवारी : ७,९०० ते ८,१००

३० जानेवारी : ७,८०० ते ८,०००

०६ फेब्रुवारी : ७,६०० ते ७,८००

१३ फेब्रुवारी : ७,४०० ते ७,६२५

१८ फेब्रुवारी : ७,३०० ते ७,५५०

२० फेब्रुवारी : ७,४०० ते ७,६००

दरातील सातत्यपूर्ण घसरणीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

संबंधित बाजारस्थिती

सरकी : ४,००० ते ४,२०० रुपये प्रति क्विंटल

रुई : ६२ सेंट प्रति पाऊंड (४५० ग्रॅम)

रुई (खंडी – ३५६ किलो) : ५३,५०० ते ५४,००० रुपये

'सीसीआय' खरेदीला मुदतवाढीची मागणी

जिल्ह्यातील १६ केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत ८ हजार १० रुपये हमीभावाने कापसाची खरेदी सुरू आहे. ही केंद्रे २७ फेब्रुवारीपर्यंत कार्यरत राहणार आहेत.

यानंतर कापसाची ग्रेड कमी करून खरेदी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र शासनाकडे सीसीआय (CCI) खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना हमीभावाचा लाभ मिळू शकेल.

शेतकऱ्यांसमोरील दुहेरी संकट

एका बाजूला उत्पादन घटले आहे, तर दुसऱ्या बाजूला बाजारभावात घसरण झाली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दरात झालेली घट शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आहे.

पांढऱ्या सोन्याच्या दरातील घसरण आणि हमीभावाच्या अनिश्चिततेमुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, केंद्र शासनाकडून तातडीने निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापूस बाजारात मोठा उलटफेर; तेजीला ब्रेक लागणार का? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton prices fall, farmers face uncertainty; CCI extension sought.

Web Summary : Cotton farmers face hardship as prices decline due to import policies and reduced yields. Farmers are seeking an extension for CCI procurement to secure fair prices amid falling market rates and rising production costs.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती