राजाभाऊ पास्टे
शेतकऱ्यांनी जीव तोडून पिकवलेली कोथिंबीर जेव्हा बाजारात नेली, तेव्हा ३५ किलो गाठोड्याला मिळाले फक्त १०० रुपये मिळाले.एवढ्या कमी भावाने हताश झालेल्या माजलगावच्या मोठेवाडीतील शेतकऱ्याने अखेर उभ्या पिकावर रोटर फिरवला. (Coriander Market)
२५ हजारांचा खर्च करूनही परतावा न मिळाल्याने आणि हमीभाव नसल्यानं शेतीच तोट्यात गेल्याने शेतकऱ्यांचा आशेवर पाणी फिरल्याची भावना नाथाराव किनोळकर यांनी व्यक्त केली. (Coriander Market)
शेतीत काबाडकष्ट करून, राबराब करून घेतलेले पीक जेव्हा हातात येते आणि त्याला बाजारात योग्य भावच मिळत नाही, तेव्हा शेतकऱ्याच्या पदरी येते ती फक्त हताशा आणि अश्रू. माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकरी नाथाराव किनोळकर यांच्यावर हेच सत्य ओढावले.(Coriander Market)
नाथाराव किनोळकर यांनी चांगला भाव मिळेल, या आशेने एक एकर पाच गुंठ्यांत कोथिंबिरीचे पीक घेतले. (Coriander Market)
रात्रंदिवस राबून, खत, औषधे, मजुरी यासाठी जवळपास २५ हजार रुपयांचा खर्च करून, चाळीस दिवस जीव ओतून त्यांची कोथिंबीर उभी केली.
परंतु जेव्हा ते पीक घेऊन बाजारात गेले, तेव्हा कोथिंबिरीच्या ३५ किलो गाठोड्याला फक्त १०० रुपये भाव मिळाला हा धक्काच होता. एवढ्या भावात तर केलेला खर्चही निघणार नाही, ही जाणीव होताच नाथाराव यांनी शेतात परत येऊन उभ्या कोथिंबिरीवर थेट रोटर फिरवला.
शेतकरी आर्थिक संकटातच राहणार का?
नाथाराव किनोळकर म्हणाले, शेतकऱ्याला हमीभाव नाही, बाजारभाव नाही, नुकसान भरपाई आणि विमा संरक्षणही वेळेवर मिळत नाही. अशी परिस्थिती झाली आहे की शेतकऱ्याला वालीच राहिलेला नाही.
त्यांचे दु:ख ऐकून परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला.
प्रशासनाने अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घ्यावा, आणि अशा संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळेल, अशी काहीतरी ठोस योजना आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महागाईत शेती तोट्यात
दिवसेंदिवस खत, बियाणे, औषधे आणि मजुरीचे दर गगनाला भिडत आहेत. परंतु शेतमालाला भाव मात्र कोसळतो. यातून शेतकऱ्याला नफा तर सोडाच, खर्चही निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जात आहेत.