CCI Kapus Kharedi : हमी दराने कापूस खरेदीला गती मिळाली असून, भारतीय कापूस महामंडळामार्फत (CCI) सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवर कापसाची आवक वाढताना दिसत आहे.(CCI Kapus Kharedi)
२२ डिसेंबरपर्यंत अकोला जिल्ह्यातील नऊ खरेदी केंद्रांवर एकूण ४ लाख २२ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली असून, याचा लाभ १८ हजार ९७१ शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.(CCI Kapus Kharedi)
नऊ केंद्रांवर हमी दराने कापूस खरेदी
अकोला जिल्ह्यात चिखलगाव, बोरगावमंजू, अकोट क्रमांक १, अकोट क्रमांक २, चोहोट्टाबाजार, तेल्हारा, पारस, बार्शिटाकळी आणि मूर्तिजापूर या नऊ केंद्रांवर सीसीआयमार्फत हमी दराने कापूस खरेदी सुरू आहे.
सध्या ८ हजार १० रुपये ते ८ हजार ६० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला जात असून, शेतकऱ्यांना विक्रीनंतर आठवडाभरात थेट खात्यावर रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे खासगी बाजारात कमी दर मिळत असताना शेतकऱ्यांचा ओढा हमी दर केंद्रांकडे वाढताना दिसत आहे.
केंद्रनिहाय कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)
चिखलगाव – ४३,६३१
बोरगावमंजू – ३२,४३५
अकोट क्रमांक १ – ४८,३७०
अकोट क्रमांक २ – ३८,३५६
चोहोट्टाबाजार – ४८,५६९
तेल्हारा – २८,९२९
पारस – १२,७७६
बार्शिटाकळी – ७९,७७४
मूर्तिजापूर – ९०,०००
या आकडेवारीवरून मूर्तिजापूर व बार्शिटाकळी केंद्रांवर सर्वाधिक कापसाची आवक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मारेगावात सीसीआय कापूस खरेदी घसरली
'पांढऱ्या सोन्याचा टापू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारेगाव तालुक्यात मात्र यंदा वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनपाठोपाठ कापसाच्या उत्पादनालाही मोठा फटका बसल्याने, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस खरेदी घटली आहे.
गेल्या हंगामात सीसीआयची खरेदी उशिरा सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकावा लागला होता. तरीही मागील वर्षी सीसीआयने १ लाख ७० हजार क्विंटल कापूस खरेदी केली होती. मात्र यंदा नापिकीमुळे उत्पादन घटल्याने अपेक्षित आवक होताना दिसत नाही.
जिनिंगमध्ये खरेदी, दरात कपात
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माहितीनुसार, मारेगाव येथे तीन जिनिंगमध्ये, तर मार्डी येथे दोन जिनिंगमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू आहे. याशिवाय टाकळखेडा मार्गावरील जिनिंगमध्येही खरेदी सुरू होणार आहे.
सीसीआयने सुरुवातीला चांगल्या प्रतीच्या कापसाला ८ हजार ११० रुपये प्रतिक्विंटल दर दिला होता. मात्र प्रतवारीचे कारण पुढे करत हा दर १०० रुपयांनी कमी करण्यात आला आहे. सीसीआयचे ग्रेडर प्रत्येक वाहनातील कापसाची तपासणी करून गुणवत्ता ठरवत आहेत.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचही जिनिंगमध्ये मिळून ९४ हजार ३३८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. मात्र यंदा उत्पादन कमी असल्याने एकूण आवक जेमतेम दीड लाख क्विंटलपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिनिंगमध्ये चढाओढ, फसवणुकीची चर्चा
कापसाची आवक कमी असल्याने आपल्या जिनिंगमध्ये अधिक कापूस यावा, यासाठी काही जिनिंग मालकांकडून वाहनचालकांना आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे काही जिनिंगमध्ये काट्यावर हेराफेरी करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमध्ये होत आहेत. परिणामी काही जिनिंग जवळपास रिकामी, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकीकडे अकोला जिल्ह्यात हमी दराने कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी, नापिकी आणि उत्पादन घट यामुळे कापूस खरेदी मर्यादित राहिली आहे. आगामी काळात कापसाची आवक, दर आणि खरेदी धोरणावर शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Web Summary : Cotton procurement speeds up in Akola under CCI, benefiting farmers. Maregaon faces decreased cotton arrival due to heavy rainfall affecting yields. Ginning mills offer incentives amid fraud concerns, impacting overall procurement.
Web Summary : सीसीआई के तहत अकोला में कपास खरीद में तेजी, किसानों को फायदा। भारी बारिश से प्रभावित उपज के कारण मारेगाँव में कपास की आवक में कमी। धोखाधड़ी की चिंताओं के बीच जिनिंग मिलें प्रोत्साहन प्रदान करती हैं, जिससे समग्र खरीद प्रभावित होती है।