मारोती कदम
शेतीत चिकाटी, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य संगम साधला तर जागतिक पातळीवरही यश मिळवता येते, हे वरुडच्या शेतकरी दिगंबर काळेवार यांनी दाखवून दिलं.(Banana Market)
आपल्या दीड एकरात पिकवलेल्या केळीला त्यांनी थेट इराण बाजारपेठेत विक्री करून विक्रमी दर मिळवला आणि शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श घालून दिला.(Banana Market)
काबाडकष्ट, योग्य नियोजन आणि जागतिक दर्जाची उत्पादकता यांच्या जोरावर वरुड येथील शेतकरी दिगंबर पुंडलिक काळेवार यांनी आपल्या केळी पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले आहे.(Banana Market)
इराणच्या बाजारपेठेत त्यांनी केळीची पहिली खेप पाठवत विक्रमी दर मिळवला. त्यांच्या केळीला बांधावरूनच प्रति क्विंटल २ हजार ३०० रुपये इतका दर मिळाला.(Banana Market)
जागतिक दर्जाची केळी तयार करण्यासाठी विशेष नियोजन
ऑगस्ट महिन्यात ‘टिश्यू कल्चर’ रोपांची लागवड करून काळेवार यांनी दीड एकर शेतात केळीचे उत्पादन घेतले. पाणी आणि रासायनिक खतांचे काटेकोर नियोजन, फवारणी आणि योग्य काळजी घेतल्यामुळे शेतातील केळी दर्जेदार झाली.
योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी खत व्यवस्थापन, फवारणी आणि आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी केली. ज्ञानेश्वर पाबळे यांच्या मदतीने शेतातील केळीची योग्य प्रक्रिया, साठवणूक आणि पॅकिंग करून पहिली १२ टनाची खेप परदेशी बाजारात पाठवण्यात आली.
* केळीला इराणच्या बाजारात विक्रमी प्रति क्विंटल २ हजार ३०० रुपये दर.
* ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाचा वापर.
* पहिलीच खेप १२ टन केळीची आंतरराष्ट्रीय बाजारात.
* शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी प्रेरणा.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून संधी
शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे आणि उत्पन्न वाढावे, यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा वापर आवश्यक असल्याचेही या यशातून स्पष्ट झाले. इराणच्या फळबाजारात काळेवार यांच्या केळीला मिळालेला प्रतिसाद ही शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे.
शेतीत काबाडकष्ट करून मेहनतीने काम केल्यास जागतिक स्तरावर पोहोचता येते, हे माझ्या अनुभवातून दिसून आले. माझ्या केळीला मिळालेला दर समाधानकारक आहे. पुढच्या काळात उत्पादन वाढवण्याचा मानस आहे. - दिगंबर काळेवार, शेतकरी
योग्य मार्गदर्शन गरजेचे
काळेवार यांच्यासारखे शेतकरी पुढे आले तर महाराष्ट्राच्या शेती उत्पादनांना मोठी संधी मिळेल. योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध झाल्यास भारतीय शेतकरीही जागतिक स्तरावर आपली छाप पाडू शकतात. - ज्ञानेश्वर पाबळे