Banana Market : राज्यातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. गेल्या महिनाभरात केळीच्याबाजारभावात विक्रमी घसरण झाली असून, शेतकऱ्यांची अक्षरशः कंबर मोडली आहे.(Banana Market)
काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल २ हजार १०० रुपयांना विकली जाणारी केळी आता फक्त ४०० ते ७०० रुपयांवर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या भावपतनामुळे उत्पादन खर्चही परत येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.(Banana Market)
अतिवृष्टी व वाहतूक ठप्प – मुख्य कारणे
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते विस्कळीत झाले. वाहतूक ठप्प झाल्याने केळीचा माल वेळेत बाजारात पोहोचू शकला नाही. परिणामी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात माल बाजारात येताच दर घसरले. व्यापारीही खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण दुप्पट झाली आहे.
पाच महिन्यांत दरांची पडझड
मे – १,८०० रु./ क्विंटल
जून – २१०० रु./ क्विंटल
जुलै – १५०० रु./ क्विंटल
ऑगस्ट – १२०० रु. / क्विंटल
सप्टेंबर – ७०० रु./ क्विंटल
एका महिन्यातील एवढ्या मोठ्या फरकामुळे शेतकरी हादरले आहेत.
लाखोंचा खर्च, उत्पन्न मात्र हजारांत
एक एकर केळी लागवडीसाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. यात बियाणे, रोपे, मजुरी, पाणी, खत, कीटकनाशके, पॅकिंग व वाहतूक यांचा समावेश असतो. पण एवढा खर्च करून मिळणारे उत्पन्न खर्चाइतकंही नाही. यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या गर्तेत ढकलले गेले आहेत.
सणासुदीतही भाव घसरले
नवरात्र व दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत फळांची मागणी वाढते, असा अनुभव आहे. मात्र यंदा उलट घडले. नवरात्रीत दर वाढण्याऐवजी कमी झाले. मोठ्या प्रमाणात आवकेसमोर मागणी कमी पडल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळालाच नाही.
ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना फटका
परभणी व ग्रामीण भागातील बाजारपेठेत केळी सध्या फक्त ४० ते ५० रुपयांत डझनभर मिळत आहेत. ग्राहकांना याचा फायदा होत असला, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे नुकसान या दरामागे दडलेले आहे.
व्यापारीही खरेदीसाठी पुढे नाहीत
अतिवृष्टीमुळे बागांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. व्यापाऱ्यांनी केळीची खरेदी करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना बागेतील पिके वाया घालवावी लागत आहेत.
गेल्या वर्षी नवरात्रात केळीला ७०–८० रुपये डझनचा भाव मिळाला होता. यंदा तोच दर ४०–५० रुपये डझनपर्यंत खाली आला आहे. ग्राहकांना दिलासा मिळाला, पण शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले.- शेख आतीक, फ्रूट व्यावसायिक
दीड लाख रुपये खर्च करून लागवड केली, पण आज मिळणारा दर खर्चाइतकाही नाही. आमची अवस्था फारच बिकट झाली आहे.- अरुणा भुजंग थोरे, महिला शेतकरी
आम्ही पिकावर लाखोंचा खर्च केला. पण मिळालेला दर म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखा आहे. घर चालवायचे कसे हा प्रश्न आहे.- जगदीश चव्हाण, केळी उत्पादक शेतकरी, गाजीपूर
यवतमाळसह अनेक ठिकाणी शेतकरी मोतीसारख्या केळीच्या जातीसाठी सोनं–चांदी गहाण ठेवून कर्ज काढतात. मात्र दर कोसळल्याने कर्ज फेडणेही अशक्य झाले आहे.
ग्राहकांना स्वस्त केळी मिळत असली तरी त्यामागे शेतकऱ्यांचे घाम, कर्ज आणि वेदना दडलेल्या आहेत. दरातील पडझडीमुळे शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.
Web Summary : Banana prices crashed from ₹2100 to ₹400-700, devastating farmers facing high production costs. Consumers enjoy cheap bananas, deepening farmer distress.
Web Summary : केले की कीमतें ₹2100 से गिरकर ₹400-700 हो गईं, जिससे किसानों को भारी नुकसान हुआ क्योंकि उत्पादन लागत बहुत ज़्यादा है। उपभोक्ताओं को सस्ते केले मिल रहे हैं, जिससे किसानों का दुख और बढ़ गया है।