युनूस नदाफ
नांदेड–बारड मार्गावर सध्या एक हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळत आहे. शेतकरी आपल्या हातांनी घडवलेल्या केळीच्या घडांसह रस्त्याच्या कडेला उभे राहून थेट विक्री करत आहेत. (Banana Market)
बाजारात मिळणारा कवडीमोल भाव आणि व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक यामुळे केळी उत्पादकांचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडून पडला आहे.(Banana Market)
लागवडीपासून ते काढणीपर्यंत लाखो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात आता काहीच पडत नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेले उत्पादन खर्च, मजुरी, वीज, खतखर्च आणि वाहतूकदर यांच्या पार्श्वभूमीवर केळीच्या दरातील मोठी घसरण शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.(Banana Market)
दर घसरले, शेतकरी रस्त्यावर!
यंदा जून महिन्यात केळीला बाजारात २ हजार २०० ते २ हजार ५०० रु. प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र, सध्या तो भाव थेट ४०० ते ६०० रु.पर्यंत कोसळला आहे. काही ठिकाणी तर एक घड केवळ १० रुपयांना विकला जात आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना थेट रस्त्यावर विक्रीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
दिवसभर बसून एखादा घड विकला तरी दिवसाचा खर्चही भरून येत नाही. शेतकऱ्यांचे “कष्टाचं सोनं मातीमोल होतंय” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अर्धापूर तालुक्यातील हजारो एकरांवरील केळी शेती संकटात
अर्धापूर तालुक्यात हजारो एकरांवर केळीची शेती आहे. पण बाजारात मागणी नसल्याने शेतातच केळीची नासाडी होत आहे. शेतकरी आपल्या पिकाकडे हताश नजरेने पाहत आहेत. पिकलेल्या केळीला बाजारपेठ नसल्याने, शेतकऱ्यांना बांगेतच केळी सडू द्यावी लागत आहे.
व्यापाऱ्यांकडून पिळवणुकीचा आरोप
शहरांमध्ये डझनला ३०–४० रु दराने केळी विकली जात असताना, त्याच केळीचे घड शेतकऱ्यांकडून व्यापारी अतिशय कमी दरात खरेदी करतात. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आणि असंतोष वाढत आहे.
'आम्ही तयार केलेलं उत्पादन शहरात महाग विकलं जातं, पण आमच्याकडे येतो तुटपुंजा भाव!' अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
खाडी देशांच्या बाजारपेठेचा परिणाम
भारतातून होणाऱ्या केळी निर्यातीपैकी सुमारे ७० टक्के निर्यात खाडी देशांकडे जाते. मात्र, अलीकडेच या देशांनी पाकिस्तानी केळीची आयात सुरू केल्याने भारतीय केळीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर झाला असून, दर कोसळले आणि शेतकऱ्यांचा आर्थिक तोल बिघडला आहे.
शेतकरी काय सांगतात?
१५०० केळीची लागवड केली होती. चार पैसे हातात येतील या आशेने खूप खर्च केला. पण काढणीच्या काळातच दरात मोठी घसरण झाली. केळी नाशवंत असल्याने बांगेतच पिकून नासाडी झाली.- मारोती दहिभाते, शेतकरी, पार्डी
१७०० रोपे लावली होती. पहिल्या फेरीत ५०० झाडांचा माल ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला. दुसऱ्या वेळी २०० घड ४०० रुपयांना विकले. पण उरलेले १००० घड पूर्णपणे सडले, एक रुपयाही मिळाला नाही.- सोपानराव मदने, शेतकरी, अर्धापूर
सरकारकडे मदतीची अपेक्षा
सध्याच्या स्थितीत केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत, हमीभाव आणि बाजारातील स्थैर्य याची गरज आहे. राज्य सरकार आणि कृषी विभागाने दर स्थिरीकरणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
Web Summary : Banana farmers face ruin due to plummeting prices. They are forced to sell on roadsides after incurring huge losses, with prices as low as ₹10 per bunch due to reduced exports.
Web Summary : केले की कीमतों में गिरावट से किसान बर्बादी का सामना कर रहे हैं। भारी नुकसान के बाद वे सड़कों पर बेचने को मजबूर हैं, निर्यात कम होने से कीमतें ₹10 प्रति गुच्छा तक गिर गई हैं।