श्रीनिवास भोसले
नांदेड : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता महाराष्ट्रातील केळी उत्पादकांना बसत असून, आंध्र प्रदेश व तेलंगणामधून विदेशात जाणारा केळीचा माल देशातच अडकल्याने मराठवाड्यातील बाजारपेठेत दर घसरले आहेत.(Banana Market)
वाढलेला पुरवठा आणि कमी झालेली मागणी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.(Banana Market)
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर आणि नांदेड तालुके तसेच हिंगोली जिल्ह्यातील वारंगा, डोंगरकडा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. (Banana Market)
सध्या 'कांदेबहार' हंगामातील केळीची आवक सुरू असताना दाक्षिणात्य राज्यांतील उत्पादनही मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे.
निर्यात बंद; माल देशातच अडकला
दरवर्षी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून उच्च दर्जाची केळी दुबई, इराण, इराक, कतारसारख्या आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते.
मात्र, यंदा युद्धामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे हा संपूर्ण माल देशांतर्गत बाजारपेठेत वळवला गेला आहे. परिणामी स्थानिक बाजारात केळीचा ओव्हर सप्लाय निर्माण झाला आहे.
उत्तर भारतातही स्पर्धा वाढली
दक्षिणेकडील उच्च दर्जाचा केळी माल पंजाब, हरयाणा, दिल्ली, चंदीगडसारख्या उत्तर भारतीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठवला जात आहे. त्यामुळे तेथील स्पर्धा तीव्र झाली असून मराठवाड्यातील केळी मागे पडत आहेत.
व्यापाऱ्यांनीही सावध भूमिका घेतल्याने स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरातच विक्री करावी लागत आहे.
खर्च जास्त; भाव कमी
केळी हे नगदी पीक असून त्यासाठी खत, पाणी, मजुरी आणि वाहतूक यावर मोठा खर्च करावा लागतो. मात्र सध्या बाजारात ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून, हा दर उत्पादन खर्चही भागवू शकत नाही.
शेतकऱ्यांना किमान १,५०० रुपये दर अपेक्षित असताना सध्याचे भाव तोट्याचे ठरत आहेत. काही शेतकऱ्यांवर तर बागेत जनावरे सोडण्याची वेळ आली आहे.
नांदेड जिल्हा केळी उत्पादनात आघाडीवर
राज्यात सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. जळगावनंतर नांदेड जिल्हा केळी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून येथे १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड आहे. त्यामुळे दरघटीचा सर्वाधिक फटका या भागाला बसत आहे.
मुख्य हंगामात आणखी दबावाची शक्यता
एप्रिल-मेपासून केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन बाजारात येणार आहे. सध्याचीच परिस्थिती कायम राहिल्यास मुख्य हंगामात दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे केळी उत्पादकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
निर्यात बंद पडल्याने निर्माण झालेला अतिरिक्त पुरवठा आणि घटलेले दर यामुळे केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
तातडीने निर्यात पर्याय, प्रक्रिया उद्योग किंवा शासकीय हस्तक्षेपाची गरज असल्याची मागणी शेतकरी करत आहेत.
अधिक वाचा : Halad Bajarbhav : हळदीने तोडले सर्व रेकॉर्ड; बाजारात मिळाला जबरदस्त भाव