विवेक चांदूरकर
उत्तर भारतातील दिल्ली, जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीचा फटका विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. (Banana Market)
या राज्यांकडे जाणारी केळीची निर्यात ठप्प झाल्याने बाजारात आवक वाढली आणि मागणी घसरल्याने दर कोसळले. गत महिन्यात १ हजार ५०० रूपये क्विंटलवर असलेले दर आता केवळ ७०० रूपये क्विंटलवर आले आहेत. (Banana Market)
केळी उत्पादकांवर आर्थिक संकट
अकोला जिल्ह्यात सुमारे १ हजार २०० हेक्टरवर केळीची लागवड असून त्यापैकी तेल्हारा व अकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. सिंचनाची सोय असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशीऐवजी फळबागांकडे वळण घेतले आहे. मात्र, सध्या बाजारात दर अर्ध्यावर आल्याने त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.
केळी नाशवंत पीक असल्याने वेळेत तोड करणे भाग असते. त्यामुळे भाव कमी असला तरी शेतकऱ्यांना केळी विक्रीस आणावी लागत आहे. बाजारात जास्त आवक व कमी मागणीमुळे भाव कोसळले. किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अजूनही ४० ते ५० रूपये डझनप्रमाणेच केळी विकत घ्यावी लागत आहे.
सणासुदीतील आशा धुळीस मिळाली
दरवर्षी सणासुदीच्या दिवसांत केळीला चांगला दर मिळतो. गतवर्षी १५०० रूपये भाव शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यामुळे या वर्षीही अशीच अपेक्षा होती. मात्र, पूरस्थितीमुळे निर्यात ठप्प झाली आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली.
खर्च लाखो, भाव अर्धा
केळी लागवड ते तोडणीपर्यंत लाखो रूपयांचा खर्च येतो. वर्षभर शेतकरी मेहनत घेऊनही त्यांना फक्त ७०० रूपये क्विंटल दर मिळत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
शासनाकडे मदतीची मागणी
केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.