Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bajari Market : चपातीपेक्षा भाकरीकडे कल, मार्केटमध्ये बाजरीचे दर कसे आहेत, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 20:37 IST

Bajari Market Rate : स्वस्त, कसदार व शरीराला उष्णता देणारी असल्याने ग्राहक बाजरीकडे वळले आहेत.

अहिल्यानगर : हिवाळ्याच्या आगमनानंतर नागरिकांच्या आहार पद्धतीत बदल दिसून येत आहे. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारा आणि पोषक आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. चपातीपेक्षा बाजरीच्या भाकरीला मागणी वाढली असून, त्यामुळे गव्हाच्या तुलनेत बाजरीचे दर झपाट्याने वाढले आहेत.

खर्डा व परिसर ऊसतोड कामगारांसाठी ओळखला जातो. ऊसतोडीच्या हंगामात कामगार बाहेर पडताना दीर्घ काळ टिकणारे व पोषक अन्नधान्य म्हणून बाजरीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. स्वस्त, कसदार व शरीराला उष्णता देणारी असल्याने ऊसतोड कामगार, तसेच सर्वसामान्य ग्राहक बाजरीकडे वळले आहेत. गतवर्षी बाजरीचा दर २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल होता, तर यावर्षी वाढून २९०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. 

गव्हाचे दर ३५०० ते ४००० रुपये आहेत. बाजरीचे उत्पादन घटल्याने बीड व राजस्थानातून बाजरी मागवली जात आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारा आणि पोषण मूल्यांनी समृद्ध असा आहार म्हणून बाजरी पुन्हा लोकप्रिय झाली आहे. बदलत्या हवामानामुळे उत्पादन घटले असले, तरी मागणी वाढल्याने बाजारपेठेत बाजरीचे दर कायम उच्च पातळीवर आहेत.

ग्रामीण भागासोबतच शहरी ग्राहकही आता बाजरीकडे वळल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. सध्या थंडी वाढल्याने बाजरीच्या भाकरीला मोठी मागणी आहे. गव्हाच्या तुलनेत बाजरीचे दर वाढले असले, तरी ग्राहक बाजरीच खरेदी करीत आहेत.- चैतन्य पेटकर, अडत व्यापारी, खर्डा

बाजरीमध्ये फायबर, पोटॅशियम व मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्याने ती वजन, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. तसेच, बाजरी ग्लुटेनमुक्त असल्यामुळे मधुमेह व सीलिएक आजार असणाऱ्यांसाठी ती उपयुक्त आहे.- डॉ. प्रियांका मेंगडे-गोलेकर, आरोग्य अधिकारी, खर्डा

English
हिंदी सारांश
Web Title : Millet Market: Demand Surges, Prices Rise Amidst Winter

Web Summary : As winter arrives, millet demand increases due to its warmth and nutritional benefits. Prices have risen to ₹3300/quintal, driven by health awareness and lower production, impacting both rural and urban consumers.
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डगहूनाचणी