नंदुरबार : जिथं पिकतं तिथं खपत नाही, असं म्हटले जाते. परंतु या म्हणीला निरर्थक ठरवत सातपुड्यातील (Satpuda) शेतकऱ्यांनी डोंगर-दऱ्याखोऱ्यात स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन मार्केट काबीज केले आहे. सातपुड्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग आत्मसात करून शेतीला व्यवसायाची जोड दिली. यामुळे सातपुड्यातील स्ट्रॉबेरीचा (Satpuda Strawberry) स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातही तोरा वाढल्याचे दिसून येत आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा (का), डाब, तोंडीकुड, साकलीउमर, आट्याबारी येथील खट्टी मिठ्ठी, लालगर्द स्ट्रॉबेरीने मार्केट काबीज केले आहे. पूर्वी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नंबर वन (Strawberry Market) असल्याचे बोलले जायचे. तेथील स्ट्रॉबेरीला बाजारात खास मागणी होती. स्ट्रॉबेरीची गुणवत्ता आणि स्वाद इतर भागांच्या तुलनेत अधिक चांगली मानली जायची. आजही काही ठिकाणी मानली जाते. परंतु याला तोड देत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण सेंद्रिय स्ट्रॉबेरी तयार केली असून, स्वदेशी बाजारपेठांमध्ये उच्च दर्जाचे स्थान प्राप्त केले आहे. या स्ट्रॉबेरीमध्ये एक वेगळीच ताजगी आणि स्वाद आहे, जी इतरांपेक्षा वेगळी व चविष्टदेखील आहे.
सध्या सातपुड्यातील स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली असून, बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. शहरातच नव्हे तर गावातदेखील स्ट्रॉबेरी विक्रेते फिरताना दिसून येत आहेत. यामुळे रोजगार तर मिळाला आहे. वालंबा (का), डाब, तोंडीकुड, साकलीउमर व आट्याबारी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. वालंबा येथील रहिवासी टेड्या फुसा पाडती यांनी तीन एकर शेतात दोन टप्प्यांत स्ट्रॉबेरीची लागवड केली. ७० दिवसांत स्ट्रॉबेरी परिपक्व झाली असून, त्यांचा परिवार सकाळी शेतात जाऊन स्ट्रॉबेरीची तोडणी करतो.
दररोज १ क्विंटल परिपक्व झालेल्या फळांची तोडणीदररोज सकाळी १० वाजेपर्यंत ८० किलो ते १ क्विंटल परिपक्व झालेली स्ट्रॉबेरीची तोडणी करून घरी आणली जाते. घरी आल्यावर २०० ग्रॅम, २५० ग्रॅम, १ किलोग्रॅमपासून ते १० किलोग्रॅमपर्यंतच्या पेट्यामध्ये पॅकिंग करून स्ट्रॉबेरी भरली जाते. २०० ग्रॅमसाठी ३५ रुपये, २५० ग्रॅम ४० रुपये व १ किलो व फिरते विक्रेत्यांना १५० रुपये दराने शेतकरी विक्री करत आहेत. हीच स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये २०० रुपये दराने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
सूर्यप्रकाशात तोडल्याने राहते स्ट्रॉबेरी फ्रेशसातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात नवनवीन प्रयोग राबवले असून तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने पिकांचे संगोपन व निगा राखली जाते.सध्या सातपुड्यात परिपक्व झालेली स्ट्रॉबेरी तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. सकाळी सूर्यप्रकाश पडताच शेतातील स्ट्रॉबेरी तोडणीला सुरुवात करतात. सकाळी तोडणी केलेली स्ट्रॉबेरी जास्त काळ फ्रेश राहते.
चांगली गुणवत्ता आणि कमी किमतीचा 'बोलबाला'सध्या स्ट्रॉबेरीचा उत्पादन वाढीमुळे दर कमी झाले असून, हे फळ कमी किमतीत मिळत असल्याने लोकांची मागणी वधारली असून गोड स्ट्रॉबेरीची आबालवृध्दामध्ये आवड अधिक वाढली आहे. बाजारात अशी वेगळीच स्पर्धा निर्माण झाली आहे, ज्यामुळे चांगली गुणवत्ता आणि कमी किमतीत वस्तू मिळाल्याने ग्राहकांना फायदा होतो.
या हंगामात ४० रुपयांमध्ये २०० ग्रॅमच्या बॉक्स पॅकिंगमध्ये स्ट्रॉबेरीचे उपलब्ध होत असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. सातपुड्याची गोड स्ट्रॉबेरी विक्रीसाठी बाजारात दाखल झाली आहे. ह्या स्ट्रॉबेरीचा गोडवा वाण्याविहीर, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, शहादा, धडगावसह नंदुरबार आणि गुजरातमधील डेडीयापाडा, सुरत, अंकलेश्वर, बडोद्यापर्यंत गोडवा पोहचला आहे.