Join us

सोयाबीनचा दर वाढण्यास होणार मदत; आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडेतेलाला तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:44 PM

गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. मात्र, गोडेतेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार.

राजाराम लोंढेआंतरराष्ट्रीय पातळीवर गोडेतेलाला तेजी असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत ग्राहकांना चटका बसत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत गोडेतेलाच्या दरात वाढ झाली असून, सरकी व सोयाबीन तेलाचे दर प्रतिकिलो पाच ते १२ रुपयांनी वाढले आहेत.

सध्या तरी तेलबियांची आवक कमी दिसत असून, एप्रिल महिन्यात गोडेतेलाच्या दरात आणखी तेजी राहील, असा बाजारपेठेचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आपल्या जीवनाश्यक वस्तूंच्या दरावर परिणाम होत असतो. सध्या या बाजारपेठेत गोडेतेलाचे दर चढेच राहिले आहेत.

त्यात देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन काहीसे कमी झाल्याने त्याचाही परिणाम दिसत आहे. आपल्याकडे सरकी, सोयाबीन, शेंगदाणा तेलाचे उत्पादन घेतले जाते. सध्या सरकी व सूर्यफूल तेलाने चांगलीच उसळी घेतली आहे. शेंगदाणा तेलाचे दर स्थिर असले तरी सर्वाधिक वापर असणाऱ्या सरकी तेलाच्या दरात प्रतिकिलो बारा रुपयांची वाढ झाली आहे.

दोन्ही बाजारपेठांचा अंदाज घेतला, तर एप्रिलमध्येही गोडेतेलाला तेजी राहणार आहे. आपल्याकडे साधारणतः एप्रिल, मे महिन्यात पावसाळ्याची बेगमी म्हणून गोडेतेलाची खरेदी करून ठेवली जाते. त्यामुळे या काळात खरेदी वाढते. मात्र, यंदा याच काळात तेलाला तेजी राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी तेलाची खरेदी करताना सावधानता बाळगली आहे.

सोयाबीनचा दर वाढण्यास मदतगेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. मात्र, गोडेतेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार असल्याने उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ब्राझील, अर्जेंटिनामध्येही सोयाबीन कमीब्राझील व अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा येथे उत्पादन घटल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडेतेलाच्या दरावर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गोडेतेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात. स्थानिक तेलबियांचे उत्पादन कमी झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत तेल जास्त तापले आहे. - हितेश कापडिया (खाद्यतेलाचे व्यापारी)

 

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीसरकारखरीपआंतरराष्ट्रीय