Join us

Soybean : महाराष्ट्रात यंदा ११ लाख २१ हजार मेट्रिक टन सोयाबीनची ऐतिहासिक खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 20:11 IST

राज्यात यंदा हमीभावाने कापूस, सोयाबीन, तूर या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे.

Pune : महाराष्ट्रात यंदा ११ लाख २१ हजार मेट्रिक टन सोयाबीनची ऐतिहासिक खरेदी झाली असून ५ लाख ११ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ५ हजार ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ही खरेदी पूर्णपणे डीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शकपणे करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री रावल बोलत होते. 

दरम्यान, राज्यात यंदा हमीभावाने कापूस, सोयाबीन, तूर या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक केंद्रावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. तर सोयाबीन आणि तूर खरेदीमध्ये दाण्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याचे कारणे देत मुद्दाम कमी दरात खरेदी केली जात असल्याचेही आरोप केले जात होते. पण यंदा राज्यात विक्रमी म्हणजेच ११ लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त सोयाबीनची खरेदी झाली आहे. 

भोकरदन तालुक्यातील एका सहकारी संस्थेद्वारे झालेल्या खरेदीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

"काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, अशा कोणत्याही गैरप्रकारांना क्षमा केली जाणार नाही. पारदर्शकतेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत." अशी माहिती पणनमंत्र्यांनी विधानपरिषदेच्या अधिवेशनात दिली. 

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेती क्षेत्र