Harbhara Bajar Bhav : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२४-२५ या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची (Harbhara) पेरणी केली. तब्बल २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याचे उत्पादन घेतले गेले. मात्र, बाजारातील दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
रब्बी हंगामात पेरणीच्या वेळी बाजारात हरभऱ्याला (Harbhara) प्रति क्विंटल ६ हजार रुपये दर मिळत होता. परंतु, शेतकऱ्यांची काढणीझाल्यानंतर नवीन शेतमाल बाजारात आल्यानंतर दर मोठ्या प्रमाणात घसरले.
सध्या बाजारात व्यापारी प्रति क्विंटल ५ हजार रुपयांनी हरभरा (Harbhara) खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे, सरकारने जाहीर केलेला हमीभाव (guaranteed price) ५,६५० रुपये प्रति क्विंटल असताना देखील शेतकऱ्यांना बाजारात कमी दर मिळत आहे.
२.५० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी घेतले हरभऱ्याचे (Harbhara) उत्पादन घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६५० रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकरी हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु रब्बी हंगाम संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप एकही हमीभाव (guaranteed price) खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.
राज्य शासनाने 'नाफेड'च्या माध्यमातून तातडीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. अन्यथा, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने जिल्ह्यात हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. शेतकऱ्यांनी काढणीनंतर आपल्या शेतमालाची विक्री सुरू केली असली, तरी हमीभावाच्या अभावामुळे बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
६५ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी
* बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यापाऱ्यांनी १५ हजार क्विंटल हरभरा तर पेडगाव येथील उपबाजार समितीने ५० हजार क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. एकूण ६५ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांकडून करण्यात आली.
* शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने सुरू करायचे हमीभाव खरेदी केंद्र अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत.
हे ही वाचा सविस्तर : Soyabean, Cotton Update: सोयाबीन, कापसाला मिळत आहेत चांगले दर; वाचा सविस्तर