Join us

Gulab Ful Market : 'व्हॅलेंटाइन-डे'ला गुलाब फुलांचा तोरा; दहा रुपयांना एक फूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:41 IST

फुल बाजारात यंदा गुलाब फुलांची आवक कमी झाल्याने फुलांचा राजा गुलाब प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र यंदा दिसत आहे.

करमाळा: प्रेमवीरासाठी व्हॅलेंटाइन डेला गुलाबाच्या फुलास विशेष महत्त्व आहे. या 'व्हॅलेंटाइन-डे'ला गिफ्ट सोबत प्रियकर प्रेयसीला गुलाब देतात. या गुलाबाच्या पाकळ्यांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

या दिवसात गुलाबाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र फुल बाजारात यंदा गुलाब फुलांची आवक कमी झाल्याने फुलांचा राजा गुलाब प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र यंदा दिसत आहे.

फेब्रुवारीचा पहिला आठवडा संपताच प्रेमवीरांना व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात. १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाइन डे' असून, या दिवशी गुलाब पुष्पाला विशेष मागणी असते.

या पार्श्वभूमीवर फुलविक्रेत्यांनी गुलाबाची मागणी नोंदवली आहे. मात्र यंदा फुलांचे उत्पादन कमी असल्याने आवक कमी होत आहे. बदलत असलेल्या वातावरणात या फूलांना कायम टवटवीत ठेवण्याची मोठी कसरत करावी लागते.

तरीही मागणी मात्र या आठवड्यात जास्त असेल त्यामुळे गुलाबाचा तोरा वाढला असून, सध्या एक किलो गुलाब फुलासाठी जवळपास ३५० रुपये मोजावे लागत आहेत. 

दहा रुपयांना एक फूलबदललेल्या वातावरणात फुलांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. आता चार ते पाच रुपयांना मिळणारे गुलाबाचे फुल व्हॅलेंटाइन डेला दहा रुपयांना एक या दराने मिळण्याची शक्यता आहे. लाल रंगाच्या गुलाब फुलाबरोबरच पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या गुलाबाला या काळात मागणी वाढते.

करमाळा तालुक्यातील कंदर, देवळाली, पांडे, साडे, खडकेवाडी शेलगाव येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या गुलाब फुलांच्या बागा आहेत. यंदा गुलाबाचे उत्पादन घटल्याने करमाळा बाजारात अहिल्यानगर, पुणे या भागातून गुलाबाची आवक होत आहे. अगोदरच उत्पादन कमी व त्यात वाहतूक खर्च त्यामुळे भाव वाढले आहेत. - एकनाथ मोहोळकर, फुलविक्रेता करमाळा 

टॅग्स :फुलशेतीव्हॅलेंटाईन्स डेबाजारमार्केट यार्डफुलं