Join us
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव खरेदी केंद्र ; शेतकऱ्यांना सोयाबीनची खरेदीत मर्यादा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 12:03 IST

वणी :  हमीभाव खरेदी केंद्रावर प्रतिहेक्टरी १४.३१ क्विंटलप्रमाणेच सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे प्रतिहेक्टरी १४ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन ...

वणी :  हमीभाव खरेदी केंद्रावर प्रतिहेक्टरी १४.३१ क्विंटलप्रमाणेच सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे प्रतिहेक्टरी १४ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होणार आहे.उर्वरित सोयाबीन नाइलाजाने त्यांना बाजारात मिळेल त्या किमतीत विक्री करण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने हेक्टरी सोयाबीन खरेदीची मर्यादा वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतात, परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित दरापासून वंचित राहावे लागते.  सरकारच्यावतीने हमीभाव केंद्रावर सोयाबीनची खरेदी केली जाते.

मात्र, हेक्टरी केवळ साडेसोळा क्विंटल सोयाबीनची शेतकऱ्यांना या केंद्रावर विक्री करावी लागते. तालुक्यातील अनेक शेतकरी हेक्टरी १८ ते २० क्विंटलपेक्षाही अधिक उत्पादन घेतात.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांसमोर उर्वरित सोयाबीनची विक्री बाजारात मिळेल, त्या किमतीत करण्याची वेळ येते. त्यामुळे हेक्टरी मर्यादा वाढविण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात.तालुक्यातील चांगल्या प्रतीच्या जमिनीत शेतकरी हेक्टरी २० क्विंटलच्या जवळपास सोयाबीनचे उत्पादन घेतात. साधारण प्रतीच्या जमिनीमध्येही हेक्टरी १६ ते १८ क्विंटल सोयाबीन होते. सध्या सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. अनेकांची काढणीची कामे पूर्ण झालेली आहेत. काही शेतकरी त्याची बाजारात विक्रीही करीत आहेत.सध्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये दर आहे. तर हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल आहे.साहजिकच सध्या बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा अधिकची रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्रावरच सोयाबीन विक्रीचा राहणार आहे. प्रतिहेक्टरी घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांकडील उर्वरित काही सोयाबीन बाजारातच विक्री करावी लागण्याची शक्यता आहे.

प्रतिहेक्टरी मर्यादेमुळे अडचणी

शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केलेली नाही. त्यामुळे काही जणांकडे गेल्या वर्षाचे व यंदाचेही सोयाबीन आहे. अशा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मर्यादमुळे सोयाबीनची विक्री करताना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यांच्यापुढे बाजारात मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री किंवा दरवाढीची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.

पिकपेऱ्यावरील सातबारा

नोंदीनुसारच शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. हेक्टरी १४.३१ क्विंटलप्रमाणे व १२ टक्के ओलाव्यानुसार सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करता येणार आहे. - प्रकाश पचारे, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ वणी

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनमार्केट यार्ड