Join us

हिंगोलीच्या मार्केट यार्डात भुईमुगाची आवक वाढली; वाचा काय मिळतोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:40 AM

समाधानकारक भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकरी भुईमूग विक्रीसाठी आणत आहेत.

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढली असून, २३ मे रोजी जवळपास दीड हजार क्विंटल भुईमूग शेंगा विक्रीसाठी आल्या होत्या. ५ हजार ते ६ हजार ३०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

जिल्ह्यातील बहुतांश भागातील भुईमूग काढणीचे काम आटोपले आहे. सध्या समाधानकारक भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकरी भुईमूग विक्रीसाठी आणत आहेत. मागील पंधरवड्यापासून आवक वाढत असून, सध्या सरासरी एक ते दीड हजार क्विंटल शेंगा विक्रीसाठी येत आहेत.

आवक वाढल्याने मोंढ्याच्या शेडची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा भुईमूग शेडबाहेर रस्त्यावर टाकावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रखर उन्हात रस्त्यावर बसून शेतमालाची राखण करावी लागत आहे.

शेडची जागा पडतेय अपुरी...

सध्या मोंढ्यात भुईमुगाची आवक वाढली आहे. त्यातच शेडमध्ये व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्प्यांनी बरीच जागा व्यापली आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहात नाही. त्यामुळे शेतमाल रस्त्यावर पडत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच रस्त्यावर पडलेल्या शेतमालाची राखणं करताना शेतकऱ्यांना प्रस्वर ऊनही डोक्यावर घ्यावे लागत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.

हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

टॅग्स :बाजारहिंगोलीशेतकरीशेतीमार्केट यार्डमार्केट यार्ड