Join us

Green Chili Market : सुगीचे दिवस आलेल्या हिरव्या मिरचीला बाजारात काय मिळतोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 15:18 IST

यंदा नवीन मिरचीला बाजारात येताच साडेसात हजार ते ११ हजारांपर्यंत उच्चांकी दर महिन्याभरात मिळाला. आता काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर (Green Chili Market)

Green Chili Market :  यंदा मिरचीला सुगीचे दिवस आले असताना अचानक तीन दिवसांपासून हिरव्या मिरचीचे भाव गडगडले. मागील आठवड्यापासून ११ हजार रुपयांपर्यंत गेलेले भाव एकाएकी १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर आल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून वरूड, मोर्शी तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र वाढले आहे. या दोन्ही तालुक्यांमधील बहुतांश शेतकरी लाल ववाळलेल्या मिरची ऐवजी हिरवी मिरची विकण्यावर भर देतात.

यंदा नवीन मिरचीला बाजारात येताच साडेसात हजार ते ११ हजारांपर्यंत उच्चांकी दर महिन्याभरात मिळाला. नंतर हेच दर हळूहळू उतरणीस आले. दिवाळीच्या आठवड्यात ५० ते ७५ तर चार दिवसांपासून १२ ते १५ रुपये किलोवर मिरची आली.  या भावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहेत.

मिरची पीक अधिक काळाचे व खर्चीक असून पिकाची मशागत, मिरची तोडण्यासाठी मजुराची टंचाई आहे. मजूर दिवसभरात २५ ते २८ किलो मिरची तोडतो, मजुरी मात्र ४०० रुपये द्यावी लागते. किमान ४० रुपये किलोप्रमाणे दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. - मुन्ना चांडक, हिरवी मिरची उत्पादक शेतकरी, राजुरा बाजार, अमरावती

मोर्शी, वरूड तालुक्यातून मिरचीची आवक होत असली तरी दिल्ली, बंगाल येथून खरेदी करण्यासाठी डेरेदाखल झालेले व्यापारी माघारी परतले. दर कोसळल्यावर शेतकरी बाहेर मार्केटमध्ये मिरची नेत नाही. त्यामुळे त्यांचा कोंडमारा होत आहे. - योगेश भोंडे, मिरची उत्पादक शेतकरी, राजुरा बाजार, अमरावती

टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डअमरावती