Join us

onion export: कांदा उत्पादकांपुढे सरकार नरमले; अखेर अटी शर्तींसह कांदा निर्यात खुली, भाव वाढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 9:59 AM

शेतकरी आणि व्यापारी यांची मागणी असलेली कांदा निर्यातबंदी (onion export ban lifted) अखेर काल उशिरा मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळपासून लिलावादरम्यान भाव काही टक्क्यांनी वधारले आहेत.

शेतकऱ्यांच्या रोषापुढे केंद्राने सपशेल माघार घेतली असून काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून कांदा निर्यात (onion export) खुली केली आहे. त्यामुळे आजपासून कांद्याचे दर काही प्रमाणात वाढल्याचे बघायला मिळाले. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने काल ४ मे रोजी यासंदर्भात नोटीफिकेशन प्रसिद्ध केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकमत ॲग्रोने निर्यातबंदी खुली करण्याचा विषय प्राधान्याने लावून धरला होता. त्यासंदर्भात वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते.

 

View this post on Instagram

A post shared by LokmatAgro.com (@lokmatagro)

उन्हाळ कांदा  बाजारात आल्यापासून कांदा निर्यातीवर बंदी होती. केवळ ९९ हजार १५० टन कांद्याला मार्चपासून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली होती. मात्र प्रत्यक्षात कांदा निर्यात केवळ ६ हजार टन इतकीच झाल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठेतील शेतकऱ्यांच्या कांद्यावर काहीच परिणाम झाला नाही. परिणामी किंमती ५ ते १२ रुपयांदरम्यान राहिल्या. 

लोकमत ॲग्रो ने दिलेले  याआधीचे  वृत्त : निर्यात खुली केली नाही, तर केंद्रावर रोष वाढणार

ऐन लग्नसराईच्या हंगामात पैशांची गरज असणे, वाढत्या तपमानामुळे कांदा खराब होणे यामुळे शेतकरी वैतागला होता. त्यातून शेतकऱ्यांचा सरकारविरोधात राग निर्माण झाला होता. तो कमी करण्यासाठी केंद्राने काल ४ मे रोजी तातडीने कांदा निर्यात खुली केली. 

कांदा निर्यातबंदी हटविल्यानंतर आज विंचूर उपबाजार समितीत कांद्याचे भाव वधारले असून चांगल्या कांद्याला प्रति किलो २० ते २५ रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

अशी आहे अटकांदा निर्यातीसाठी कमीत कमी निर्यात मूल्य ५५० अमेरिकन डॉलर प्रति टन असायला हवे. याचाच अर्थ निर्यातदारांना ४६ ते ४७ रुपये प्रति किलोच्या खाली कांदा विकता येणार नाही. याशिवाय कांद्यावर ४० टक्के एक्स्पोर्ट ड्युटी कायम असणार आहे. मध्यंतरी व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी ग्राहक संरक्षण मंत्रालयाला पत्र देऊन ८०० अमेरिकन डॉलर प्रति मे. टन भावाप्रमाणे कांदा निर्यात करण्याची तयारी दाखविली होती.

मागचे नुकसान कोण भरून देणारऑगस्ट २३ पासून सरकारी धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसान झाले आहे. आधी  निर्यातीवर शुल्क लावणे, नंतर निर्यात मूल्य ८०० डाॅलर करणे आणि त्यानंतर थेट निर्यातबंदी करणे यामुळे भाव पडून कांदा उत्पादकांचे जे नुकसान झाले आहे, ते सरकार भरून देणार का?  याशिवाय आज ५५० डॉलर निर्यात मूल्य प्रति टनासाठी ठेवले आहे, ती अट पूर्णपणे काढण्याची आवश्यकता आहे.- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना

 

शेतकऱ्यांना किती फायदा?कांदा उत्पादक पट्ट्यात पुढील पंधरवड्यात मतदान होणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वाढत्या रोषामुळे केंद्र सरकारने MEP minimum export price 550 डॉलर ची मर्यादा ठेऊन कांदा निर्यात सुरू केली आहे.  DGFT कडून कांदा निर्यातबंदी खुली केल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. केंद्र सरकारने विनाअट,विनामर्यादा निर्यात खुली केली पाहिजे कारण 550 डॉलर प्रति मेट्रिक टन ची मर्यादा पण एक प्रकारे निर्यातबंदीच घालण्यात आली आहे.- नीलेश शेडगे,  शेतकरी संघटना

टॅग्स :कांदाशेतकरीशेती क्षेत्र