Join us
Daily Top 2Weekly Top 5

लासलगांव मार्केटच्या मानोरी खुर्द केंद्रावर भुसार व तेलबियांच्या लिलावाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:40 IST

भरवस / मानोरी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी दि. १ सप्टेंबर २०२३ रोजीचे पत्रान्वये मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करावे अशी बाजार समितीकडे मागणी केली होती. 

लासलगांव बाजार समितीच्या मानोरी खु. (फाटा) येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार, दि. 14 नोव्हेंबर पासून भुसार व तेलबिया शेतीमाल लिलाव सुरू करण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

प्रारंभी बन्सीलाल केशव वावधाने, रा. मानोरी खु. यांनी पारंपारीक पध्दतीने बैलगाडीतुन आणलेल्या सोयाबीन व इतर शेतीमालाचे बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे यांचेसह उपस्थित सर्व पदाधिकारी व व्यापारी वर्गाच्या शुभहस्ते विधीवत पूजन करण्यात आले. 

निफाड तालुक्यातील मौजे मानोरी खुर्द, देवगांव, शिरवाडे, वाकद, कानळद, खेडलेझुंगे, कोळगांव, भरवस, वाहेगांव, गोंदेगांव, गोळेगांव इ. गावांसह येवला, सिन्नर, कोपरगांव या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकरी बांधवांना त्यांचा भुसार व तेलबिया शेतीमाल जवळच विक्री करणे सोईचे व्हावे यासाठी भरवस / मानोरी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी दि. १ सप्टेंबर २०२३ रोजीचे पत्रान्वये मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करावे अशी बाजार समितीकडे मागणी केली होती. 

सदर मागणीच्या अनुषंगाने बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून मौजे मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करणेसाठी खात्याची मान्यता घेतली आहे. या खरेदी-विक्री केंद्रासाठी दिपक शिवाजी साबळे, रा. मानोरी खुर्द यांनी त्यांचे मालकी व कब्जे वहीवाटीची जागा व इतर अनुषंगिक सुविधा बाजार समितीस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर पासुन दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सदर खरेदी-विक्री केंद्रावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत. 

भुसार व तेलबिया शेतीमालाची खरेदी-विक्री करणेसाठी आतापर्यत ११ अडते व ११ अ वर्ग व्यापारी (खरेदीदार) यांनी बाजार समितीकडून परवाने घेतले असून त्यांचेमार्फत खरेदी-विक्रीचे कामकाज होणार आहे. सदर खरेदी-विक्री केंद्रावर आठवड्याच्या प्रत्येक सोमवार ते शुक्रवार (सुट्टीचे दिवस सोडुन) या ०५ दिवस सकाळी १० ते ०१ व दुपारी ०३ ते ०५ या वेळेत लिलावाचे कामकाज चालणार आहे. बाजार समितीच्या नियमाप्रमाणे चोख वजनमाप, रोख चुकवती व अधिकृत बाजार आकार यामुळे येथे शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांना आता सुरक्षिततेची हमी मिळणार असून जवळच माल विक्रीची सोय निर्माण झाल्याने शेतकरी बांधवांच्या वेळेची व खर्चाची बचत होणार आहे. 

लिलावाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात ७० वाहनांतून वेगवेगळा भुसार व तेलबिया शेतीमाल विक्रीसाठी आला असून सोयाबीन रू. ५,१११/-, मका रू. २,१६१/-, गहु रू. २,०००/-, बाजरी रू. २,१००/-, हरभरा रू. 5,4००/-, धने रू. ८,३००/- व करडई रू. ४,५००/- या शेतीमालाची सर्वसाधारण दराने विक्री झाली आहे.

याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य भिमराज काळे, जयदत्त होळकर, संदीप दरेकर, राजेंद्र डोखळे, सोनिया होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, पंढरीनाथ थोरे, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, सरपंच मिना माळी, उपसरपंच अनिता संभेराव, रामदास वावधाने, मयूर वावधाने, निर्मला वावधाने, मानोरी खु. वि. का. सेवा सहकारी संस्थेचे दशरथ वावधाने, बबन वावधाने, बाजीराव वावधाने, सोपान संभेराव, मच्छिंद्र वावधाने, राजाराम संभेराव, गोरक्षनाथ संभेराव, नवनाथ संभेराव, शरद वावधाने, लासलगांव खरेदी-विक्री संघाचे संचालक राजाराम मेमाणे, वेफकोचे चेअरमन संजय होळकर, प्रदीप तिपायले, गुणवंत होळकर, शिवाजी सुपनर, लहानु मेमाणे, शांताराम जाधव, विनोद जोशी, भागवत बोचरे, व्यापारी दिपक साबळे, नामदेव वाळुंज, ज्ञानेश्वर पोमनार, संतोष घाडगे, अतुल लोहारकर, आप्पासाहेब पारखे, धनंजय जोशी, योगेश बागल, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, प्रभारी संदीप निकम, रामदास गायकवाड यांचेसह सर्व कर्मचारी, परीसरातील सर्व शेतकरी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश कुमावत व सुनिल डचके यांनी केले.

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीबाजारदिवाळी 2023