Join us

बाजारात आले रसाचे गावरान आंबे; वाचा काय आहे दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:53 AM

अवकाळीचा तडाखा पारंपरिक पद्धतीने पिकवितात आंबे

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी आंब्यांची लागवड केली जाते. मात्र यंदा अवकाळीमुळे आंब्याचा बराचसा बहर गळून पडल्याने गावठी आंब्याच्या उत्पादनात घट आली आहे. सद्यस्थितीत गडचिरोली शहराच्या बाजारपेठेत ग्रामीण भागातून अनेक शेतकरी व नागरिक विक्रीसाठी गावरान आंबे आणले आहेत. विशेष म्हणजे गावरान आंबे पारंपरिक पद्धतीने पिकविले जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेताच्या बांधावर शेतकरी आंब्याच्या झाडाची लागवड करीत असतात. तर प्रगतशील शेतकरी आमराई लावत आले आहेत. शेतकऱ्यांकडील गावरान आंब्याला ग्राहकांची अधिक पसंती असते. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील बाजारात गावरान आंब्याची विक्री सुरू झालेली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात गारवा देणारा आमरस प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. शेतकरी आंबे पाडाला आल्यावरच त्याची उतरण करीत असतात. आंबे पिकविण्यासाठी बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आले आहेत. गावरान आंब्याच्या किमती वाढल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे आंबे हातोहात विकले जाते. सध्या रसाचे गावरान आंबे प्रती किलो ५० ते ६० रुपये दराने विकले जात आहे.

लोणचाच्या आंब्याची मागणी जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात वाढली आहे. उन्हाळ्यात बऱ्याच गृहिणी आंब्याचे लोणचे तयार करून त्याचा गरजेनुसार वापर करीत असतात. बहुतांश आंबे उत्पादक शेतकरी व विक्रेते लोणचाचे आंबेही विक्रीसाठी ठेवत आहेत. आंबा उत्पादक शेतकरी दरवर्षी गावठी आंब्याची विक्री करून आर्थिक मिळकत प्राप्त करीत असतात. बच्चे कंपनीकडूनही रसाच्या आंब्याला अधिक पसंती दर्शविली जात आहे.

सद्यस्थितीत गावरान आंबे बाजारात उपलब्ध झाले असून नागरिक या आंब्याकडे आकर्षित होत असून सर्वत्र आंबे विक्रीला उधाण आले आहे. अलिकडे तालुका ठिकाणच्या आठवडी बाजारात गावरान व संकरित आंब्यांची आरास दिसून येत आहे. ग्राहकांचीही पसंती मिळत आहे.

उन्हाची दाहकता वाढल्याने आंब्याला ग्राहकांकडून चांगली पसंती आहे. आमच्याकडे गावरान, संकरीत तसेच लोणच्याचे आंबे उपलब्ध आहेत. शहरी भागातील लोक गावरान आंबे चवीने खातात.  - सुरेश भोयर, विक्रेता.

संकरीत आंब्याचे दर अधिक

गडचिरोली शहरात संकरीत आंबेही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहे. या आंब्यांची आवक नागपूरच्या बाजारपेठेतून शहरात होत आहे. संकरीत आंब्याचे दर गावरान आंब्यापेक्षा अधिक आहे. संकरीत आंब्याच्या वाणानुसार दर वेगवेगळे आहेत. दीडशे ते दोनशे रुपये दराने हे आंबे विकले जात आहे.

वादळाने २० टक्के आंबे गळून पडले

गेल्या आठ-दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून अधून-मधून अवकाळी वादळी पाऊस होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे झाडाचे जवळपास २० टक्के आंबे गळून पडले. त्यामुळे आता उर्वरित आंब्यावर शेतकऱ्यांची मदार आहे.

शहरी भागात आमरसाची मागणी वाढतीवर

उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. शहरी भागातील नागरिकांचा थंडपेय प्राशन करण्यावर अधिक भर आहे. दरम्यान गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज येथे आंब्याच्या रसाची मागणी वाढली आहे. शहरी भागात सध्या १५ रुपये एक ग्लास अशा दराने आमरस विकला जात आहे. सायंकाळच्या सुमारास आमरसासाठी फुटपाथवर नागरिकांची गर्दी दिसून येते.

हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

टॅग्स :आंबाफळेबाजारविदर्भ