Join us

Flower Market : निवडणुकीमुळे मोगरा अन् गुलाबाचा सुगंधही महागला ; प्रतिकिलो 'हा' मिळतोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:47 IST

सध्या तरी फूल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यभर सुरू असून फुलांचे हार व पुष्पगुच्छांना मागणी आहे. (Flower Market)

Flower Market :

राहुल वरशिळ/ जालना : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यभर सुरू असून, त्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना विविध साहित्य, वस्तू व विशिष्ट बाबींसाठी खर्च मर्यादा घालून दिलेली आहे. त्यानुसार उमेदवारांना प्रचार कामात झालेला खर्च त्याच मर्यादेत दाखवावा लागत आहे.

यात फुलांचे हार व पुष्पगुच्छांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता फुलेही चांगलाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे. जालना शहरासह भोकरदन येथील बाजारात ऐरवी २०० रूपये किलो मिळणारी गुलाबाची फुले चारशेवर पोहोचली आहेत. तर, मोगऱ्याच्या एक किलो फुलांसाठी ३५० ऐवजी ६०० रुपये मोजावे लागत आहेत.

त्यामुळे सध्या तरी फूल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. आता प्रचारासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून गावोगावी जाऊन बैठका, सभांसह भेटीगाठी घेण्यावर अधिक भर दिला जात आहे.

यात उमेदवारांसह स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांचे हार तयार करून आणले जात आहे. यात उमेदवारांना गुलाब आणि शेवंतीच्या फुलांचा, तर सर्वसामान्यांसाठी झेंडूच्या फुलांचा हार घातला जात आहे. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी उमेदवारांनी स्वतंत्र यंत्रणाच उभी केली आहे.

त्यांच्याकडे बाजारातून विविध प्रकारचे हार, बुके, बैठका, सभास्थळी पोहोच करण्याचे काम देण्यात आले आहे. एवढेच काय, लाउडस्पीकर व इतर साहित्यांवरील खर्चाच्या यादीतनिवडणूक विभागाने लहान हार व मोठे हार, पुष्पगुच्छ आदींच्या खर्चाचे दरही निश्चित केले आहेत. परंतु, निकाल लागेपर्यंत हे भाव असेच राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

५० टक्क्यांनी वाढली फुलांची मागणी

• सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने बैठका, सभांसह भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या स्वागतासाठी हार, पुष्पगुच्छांची ५० टक्क्यांनी मागणी वाढली आहे.

• यात प्रामुख्याने गुलाब आणि मोगरा फुलांना अधिक मागणी आहे; परंतु त्या तुलनेत आवक कमी होत आहे. परिणामी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथील बाजारांतून फुले आणावी लागत असल्याचे फूल विक्रेते मधुकर ताटे यांनी सांगितले.

बुके अन् हारांचे दरही वधारले

सध्या राजकीय नेत्याचे स्वागत करण्यासाठी बुके आणि हारांना अधिक मागणी आहे. यात १५० पासून ते ५०० रुपयांपर्यंत बुके उपलब्ध आहेत. तसेच, नेत्यांना घालण्यासाठी बनवलेले हार ५ हजारांपासून पुढे तयार करून दिले जातात. यात भोकरदन येथील एका स्थानिक नेत्याच्या स्वागतासाठी १५० किलोंचा हार १५ हजारांमध्ये तयार करून दिला होता. त्यामुळे सध्या फुलांना अधिक भाव आला आहे. - मधुकर ताटे, फूल विक्रेता, भोकरदन.

सध्या बाजारातील फुलांचे दर (किलोमध्ये)

गुलाब             ४०० रुपये
शेवंती             २५० रुपये
मोगरा             ६०० रुपये
झेंडू                १०० रुपये
निशिगंध           ३०० रुपये
अष्टर               ३०० रुपये
काकडा            ७०० रुपये
पिवळी शेवंती     १५० रुपये
टॅग्स :शेती क्षेत्रफुलंफुलशेतीशेतकरीशेती