Join us
Daily Top 2Weekly Top 5

Flower Market : विधानसभा निवडणुकीमुळे बाजारात निशिगंध अन् गुलाबाचा सुगंध महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 09:57 IST

एरवी २०० रुपये किलो मिळणारी गुलाबाची (Rose) फुले ३०० वर पोहोचली असून, फूल विक्रेते सध्या २० रुपये नग या दराने गुलाब विकत आहेत. निशिगंधाच्या एक किलो फुलांसाठी २०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सध्या तरी फूल उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) सुगीचे दिवस आहेत.

खामगाव : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, त्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना विविध साहित्य, वस्तू व विशिष्ट बाबींसाठी खर्च मर्यादा घालून दिलेली आहे. त्यानुसार उमेदवारांना प्रचार कामात झालेला खर्च त्याच मर्यादेत दाखवावा लागत आहे. यात फुलांचे हार व पुष्पगुच्छांचाही समावेश करण्यात आला आहे.

शहरात एरवी २०० रुपये किलो मिळणारी गुलाबाची फुले ३०० वर पोहोचली असून, फूल विक्रेते सध्या २० रुपये नग या दराने गुलाब विकत आहेत. निशिगंधाच्या एक किलो फुलांसाठी २०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सध्या तरी फूल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आहेत.

आता प्रचारासाठी केवळ एकाच दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून गावोगावी जाऊन बैठका, सभांसह भेटीगाठी घेण्यावर अधिक भर दिला आहे. यात उमेदवारांसह स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांचे हार व गुलदस्ते तयार करून आणले जात आहे.

उमेदवारांना गुलाब आणि शेवंतीच्या फुलांचा, तर सर्वसामान्यांसाठी झेंडूच्या फुलांचा हार घातला जात आहे. उमेदवारांनी यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उभी केली. त्यांच्याकडे बाजारातून विविध प्रकारचे हार, बुक्के बैठका सभास्थळी पोहोच करण्याचे काम देण्यात आले आहे. खर्चाच्या यादीत निवडणूक विभागाने लहान हार व मोठे हार, पुष्पगुच्छ आदींच्या खर्चाचे दरही निश्चित केले आहेत; परंतु निकाल लागेपर्यंत हे भाव असेच राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

सध्या बाजारातील फुलांचे दर (किलोमध्ये)

गुलाब२० रुपये (नग)
शेवंती१५० रुपये
झेंडू६०-८० रुपये
निशिगंधा२०० रुपये
पाकळी४०० रुपये

ऑर्डरप्रमाणे बुके अन् हार!

सध्या राजकीय नेत्याचे स्वागत करण्यासाठी बुके आणि हारांना अधिक मागणी आहे. यात ५० पासून ते ५०० रुपयांपर्यंत बुके व हार उपलब्ध आहेत, तसेच नेत्यांना घालण्यासाठी बनविलेले विशेष हार पाच हजारांपासून पुढे तयार करून दिले जातात. त्यामुळे सध्या फुलांना अधिक भाव आला आहे. - गणेश बोदडे, फूल विक्रेता, खामगाव.

फुलांना मागणी वाढली

सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने बैठका, सभांसह भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या स्वागतासाठी हार, पुष्पगुच्छांची चांगलीच मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने गुलाब, शेवंती आणि झेंडू या फुलांना अधिक मागणी आहे. फुल विक्रेत्यांना अच्छेदिन आले आहेत.

हेही वाचा : Farmer Success Story : अभियंता तरुणाचा यशस्वी फूलशेती प्रयोग; तीन एकरात बहरली फुलांची राणी 'शेवंती'

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारफुलंशेतकरीनिवडणूक 2024