कापूस भाववाढीची आशा फोल ठरल्यानंतर शेतकरीकापूस विक्रीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय सीसीआयकडून कापूस खरेदी केली जात असल्याने आवक वाढली आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून सीसीआयकडून बाजार समितीच्या कापूस यार्डात ३ लाख क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी केली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सेलू हे कापसाचे आगर बनले आहे. दरम्यान, कापूस जिनिंग प्रेसिंगवर वाहनांच्या रांगा लागत आहेत.
सेलू तालुक्यात सिंचनाच्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या प्रमुख पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक मदत अवलंबून आहे.
त्यामुळे दरवर्षी सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. यंदा जून महिन्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जून अखेरपर्यंत खरीप हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली होती.
महागडी बियाणे, औषधी, खते उसनवारीवर खरेदी करून पेरणी केली. जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पिके बहरात असतानाच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर सर्वाधिक नुकसान सोयाबीन व कापसाचे झाले होते.
अतिवृष्टीनंतर शेतात अनेक दिवस पाणी साचून राहिल्याने कापसाचे पीक पाण्याखाली गेले होते. परिणामी कापूस पिवळा पडला होता. तसेच सोयाबीन काढणीलाच परत पाऊस पडल्यानंतर उत्पन्नात मोठी घट झाली होती. त्यामुळे कापसावर शेतकऱ्यांची मदार अवलंबून होती.
अतिवृष्टी, पावसाचा खंड, दुष्काळस्थिती या नैसर्गिक आपत्तीबरोबरच पिकांवर कीड रोगांचा प्रादूर्भाव ही संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. यातून हाती आलेल्या पिकाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर, अशी प्रचिती येत आहे.
शेती करावी तरी कशी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत असताना मागील काही दिवसांपासून सोयाबीन, कापसाचे भाव घसरल्याने यंदा शेतीचा खर्च निघनेही मुश्कील झाल्याची स्थिती तालुक्यात आहे.
सुरुवातीपासून कापसाचे भाव समाधानकारक मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला होता. मात्र, भाववाढीची आशा मावळल्याने कापूस विक्रीसाठी दाखल होत आहे.
'या' तालुक्यातून कापसाची आवक
सेलू येथील बाजारपेठेत पाथरी, सोनपेठ, परळी, माजलगाव, मंठा या पाच तालुक्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे जिनिंग परिसरात गाड्यांची मोठी गर्दी होत आहे.
सेलूत डिसेंबरपासून वाढली आवक
• शेतकरी आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील, या आशेवर होते. परंतु, पेरणीसाठी केलेली उसनवारी व इतर कार्यासाठी पैशाची गरज भासत असल्याने डिसेंबरपासून शेतकरी घरात ठेवलेला कापूस विक्रीस आणत आहेत.
• दरम्यान, सेलू शहरात मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होत असल्यामुळे सेलू बाजारपेठ कापसाचे आगर बनले आहे.
इतर जिल्ह्यांतून कापसाची आवक
• सेलू व परिसरात कापूस जिनिंग, प्रेसिंग, ऑइल मिलची मोठी संख्या आहे. त्यामुळे दरवर्षी इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापूस विक्रीस आणतात. सहद्यस्थितीत शहरातील सात कापूस जिनिंगवर सीसीआयकडून खरेदी केली जात आहे.
• सीसीआयकडे कापूस विक्री केल्यानंतर सहा ते आठ दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. मात्र, मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून जमा झालेली रक्कम एककलमी शेतकऱ्यांना देण्यात येत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.