Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात नवीन उडीदची आवक; सोयाबीन दरात वाढ; मुगाचे दर गडगडणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 18:39 IST

नवीन मुगानंतर मागील दोन दिवसांपासून उडदाची आवक सुरू झाली आहे. काय मिळाले भाव वाचा सविस्तर

विनायक चाकुरे

उदगीर  येथील मार्केट यार्डमध्ये नवीन मुगानंतर मागील दोन दिवसांपासून उडदाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे यावर्षी बाजारात मागील वर्षाच्या तुलनेने लवकरच खरीप हंगाम सुरू होणार आहे. सध्या मार्केट यार्डमध्ये जुन्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, दरामध्ये २५० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मूग आणि उडीदमध्ये ओलावा असल्याने हमीभावापेक्षा २ हजार रुपये प्रतिक्विंटलने बाजारात विक्री होत आहे. नवीन मूग ६ ते ७ हजार ५०० क्विंटल तर उडीदला ७ हजार ३०० भाव मिळाला आहे. यावर्षी तालुक्यात वेळेवर मान्सून दाखल झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकाची पेरणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली.

त्यानंतर अधूनमधून पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे खरिपाच्या पिकाला पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मूग व उडीदच्या पेरणीचे क्षेत्र वाढले. तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित खरीप हंगामातील सोयाबीन व तूर पिकाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नाही. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने दोन वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन आतापर्यंत विक्रीविना घरी साठवून ठेवले होते.

परंतु सोयाबीनने शेवटी शेतकऱ्याला रडवलेच. नवीन सोयाबीन येण्याचा काळ नजीक आलेला असताना सुद्धा भाव वाढले नाहीत. हंगामातील दरापेक्षा आठशे रुपयांनी भाव कमी झाले. ४ हजार ३०० पर्यंत खाली आलेला दर मागील काही दिवसांपासून २५० रुपयांची वाढ होऊन ४ हजार ५५० पर्यंत सोयाबीनला भाव मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांत सोयाबीन दर आणखी सुधारतील अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.

उडीद, मुगाला हमीभावापेक्षा कमी भाव...

* मागील पंधरा दिवसांपासून बाजारात नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. सरकारने मुगासाठी ८ हजार ६८२ तर उडीदला ७ हजार ४०० चा भाव जाहीर केला आहे. परंतु, मुगाला ६ हजार ते ७ हजार ५०० पर्यंत क्विंटलचा भाव मिळत आहे, म्हणजेच हमीदरापेक्षा कमी दराने मालाची विक्री होत आहे. मालामध्ये ओलावा असल्याने जास्तीचा दर देणे परवडत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर शासनाच्या हमीदरापेक्षा कमी दराने मालाची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

सोयाबीन दरात वाढ होईल...

* मागील तीन वर्षांचा अनुभव पाहता सोयाबीनला दर हंगामात चांगला भाव मिळत आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कदाचित नवीन सोयाबीनची आवक बाजारात सुरू होईल. त्यामुळे जुन्या सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.

* तीन वर्षांपूर्वी सोयाबीनचे दर दहा हजारांवर गेले होते. तेव्हापासून पेरणी क्षेत्रातही वाढ झाली. मात्र, दरात घसरण कायम राहिली आहे. यंदा दर वधारतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रमूगसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड