Join us

मुंबई बाजार समितीमधील ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:37 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली होती. परंतु, या दोन्ही उपक्रमांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते बंद झाले आहेत.

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली होती. परंतु, या दोन्ही उपक्रमांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते बंद झाले आहेत. लिलावगृहामधील संगणक व प्रयोगशाळेतील साहित्यही हलविण्यात आले आहे. दोन्ही उपक्रमांचे आता फक्त नामफलकच शिल्लक राहिले आहेत.

केंद्र शासनाने देशभरातील बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाला दिल्या होत्या. पणन मंडळाने राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रक्रिया सुरू केली होती.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली होती. ई-लिलाव प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी बाजार समितीच्या मुख्यालयामध्ये जानेवारी २०१९ मध्ये कृषी माल ई-नाम लिलाव कक्ष तयार केला होता. तत्कालीन पणन संचालकांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन केले होते. 

कृषिमाल गुणवत्ता तपासण्यासाठी बसवली होती यंत्रणा

  • देशभरातील कृषी मालाचे बाजारभाव समजावे यासाठी एलईडी स्क्रीन बसविली होती. संगणक कक्ष तयार करून तेथेही तज्ज्ञ कर्मचारीही नेमले होते. परंतु, या उपक्रमास राज्यातील इतर बाजार समितीप्रमाणे मुंबई बाजार समितीमध्येही प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासन व व्यापाऱ्याऱ्यांनीही प्रयत्न केल्यानंतरही हा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. सद्यःस्थितीमध्ये केंद्राला टाळे लावून आतमधील संगणक हलविले आहेत. फक्त एक एलईडी स्क्रीन शिल्लक आहे.
  • कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेमध्ये सर्व प्रकारच्या कृषी मालाची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा बसविली होती. कृषिमाल किती शुद्ध आहे, त्यामध्ये घातक गोष्टींचा समावेश आहे की नाही हे तपासण्याची सुविधा या प्रयोगशाळेत होती. यासाठी तांत्रिक कर्मचारीही नियुक्त केले होते. परंतु, या प्रयोगशाळेलाही प्रतिसाद मिळाला नाही. कृषिमाल तपासण्यासाठी कोणी आलेच नाही. यामुळे ही प्रयोगशाळाही बंद केली आहे.
  • प्रयोगशाळेच्या आतमधील साहित्यही हलविले आहे. हे दोन्ही उपक्रम पुन्हा सुरू होणार की नाही याविषयी माहिती घेण्यासाठी सचिव पी. एल. खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी सद्यःस्थितीची माहिती घेण्यात येईल. दोन्ही उपक्रम सुरु केल्यापासूनचा प्रतिसाद व त्या-त्या वेळी काय निर्णय घेतले होते याचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना त्यानुसार करण्यात येतील, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कमोडिटी एक्सचेंजलाही मिळाला नव्हता प्रतिसादधान्य मार्केटमध्ये कमोडिटी एक्सचेंजमधील सर्व बाजारभाव व अद्ययावत माहिती मिळावी यासाठी डिजिटल नामफलक बसविला होता. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु, यासही फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते बंद झाले आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्याच्या हापूसला चांगला दर मिळावा यासाठी आंबा फळ, पेटी व बॉक्सवर 'क्यूआर कोड'

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारपीकमार्केट यार्डमुंबईनवी मुंबईशेतकरीशेती