Join us

उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 12:07 PM

घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला.

सातारा जिल्ह्यातील फूल उत्पादकांना यंदा गणपती बाप्पा पावला आहे. गणेशोत्सवामुळे फुलांना मोठी मागणी होती. घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला.

उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांना फुलाला चांगला भाव मिळेल, अशी आशा असते. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फुलांवरच संपूर्ण फूल व्यवसायाची भिस्त आहे यासाठी शेतकऱ्यांपासून वितरणापर्यंत हजारो हातांना काम मिळते. यावर लाखो लोकांचे संसार अवलंबून असतात. फूल उत्पादक शेतकरी शेतमजूर फूल वाहतूकदार फूल दुकानदार होलसेल व किरकोळ फूल विक्रेते असे अनेकांचे संसार या हंगामावर अवलंबून असतात.

गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सणावर फूल व्यवसायाचा मोठा पगडा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये प्लास्टिकच्या फुलांचा बाजार वाढल्याने फूल उत्पादक शेतकरी हातबल झाले होते. आता पुन्हा एकदा नैसर्गिक फुलांना मागणी वाढल्याने फूल उत्पादक शेतकरी आनंदला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत भक्तांनी शेकडो टन फुलांची मागणी नोंदविली होती.

अनेक महिलांनी गौरी सजावटीसाठीही या फुलांचा मुक्त वापर केला होता. त्यामुळे फुलांचा बाजार आणि दर चांगलाच वधारला. गेल्या काही वर्षांपासून फूल व्यवसायावर असलेल्या मंदीचे विघ्न यंदाच्या गणेशोत्सवात दूर झाल्याची भावना फूल उत्पादकांनी व्यक्त केली. याचपद्धतीने दसरा दिवाळीमध्येही फुलांचा कल्पकतेने वापर करून सजावट करण्याचा संकल्प सातारकर व्यक्त करत आहेत.

या फुलांना सर्वाधिक मागणी- गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच घरगुती गौरी-गणपती सजावटीसाठी निशिगंधा, गुलाब, अष्टर, झेंडू, शेवंती, जरबेरा, ऑर्चिड, जिप्सी, सूर्यफूल या फुलांचा वापर करण्यात आला.- साताऱ्यातील शेतकऱ्यांकडून बहुतांश माल विक्रीसाठी पुणे किंवा मुंबईला जातो. काही शेतकऱ्यांनी हा माल साताऱ्यााच्या बाजारपेठेतही उपलब्ध करून दिल्याने या फुलांचा मुक्त वापर करता आला.

नैसर्गिक फुलांचा गंध आणि त्यांच्या रंगाने सजावटीत खूप फरक पडतो. त्यामुळे दारातील रांगोळी, घराचे कोपरे आणि गौरी सजावटीसह बाप्पांची आरास हे सगळंच नैसर्गिक फुलांपासून केले. फुलांच्या गंधामुळे अवघ्या घरात उत्सवाची अनुभूती येते. - अभिलाषा दळवी, सातारा

टॅग्स :फुलंमार्केट यार्डबाजारसातारागणेशोत्सवशेतकरीपीकशेती