Cotton Market : मायबाप सरकार, निवडणुका संपल्या आहेत. आता पांढऱ्या सोन्याला किमान दहा हजार रुपये तरी भाव द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत.संतप्त शेतकऱ्यांनी सरकारला साकडे घातले आहे, दिवाळीपासून घरात साठवलेल्या कापसाला पिसा होत आहे.
केंद्र सरकारने २०२४-२५ च्या हंगामासाठी सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल तर मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५२१ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला.
खासगी बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळे कापसाला मिळणाऱ्या दरातून उत्पादनाचा खर्च तरी भरून निघेल का, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २९ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. जुलै ते ऑगस्टदरम्यान या पिकाला वारंवार अतिवृष्टीसह किडींनीही कापसाचे नुकसान झाले.
त्यातच खते, औषधांच्या किंमती बेसुमार वाढल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशात पिकासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. प्रत्यक्ष हे पीक हाती येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजारात दर कोसळू लागले.
पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नसल्याने दिवाळीपासून घरात साठवून ठेवलेल्या कापसाला पिसा होऊ लागल्याने लहानांपासून ते थोरांच्या अंगाला काही प्रमाणात खाज येऊ लागली आहे. त्यामुळे काही शेतकरी मिळेल त्या भावाने कापूस विक्री करीत आहेत.
परंतु, ज्या शेतकऱ्यांकडे कापूस ठेवण्यासाठी स्वतंत्र घर आहे, अशा शेतकऱ्यांकडून किमान कापसाला १० हजार रुपयांचा भाव देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या कापूस ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केला जात आहे. मायबाप सरकार, आता निवडणुकाही संपल्या आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याला किमान दहा हजारांचा तरी भाव द्यावा, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड होते. मात्र, यंदा कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला. यंदा विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यामुळे भाव वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापसाचे ढीग लावले आहेत. परंतु विधानसभा निवडणुकाही पार पडल्या आहेत.
तरीही कापसाला भाव मिळेना, शेवटी सरकार स्थापन झाल्यानंतर भाव मिळेल, अशी चर्चा सध्या गावागावात शेतकऱ्यांत सुरू आहे. उत्पादन खर्च वाढूनही भाव ७ हजार रुपयांच्या पुढे गेला नाही. त्यात परतीच्या पावसामुळे चांगल्या दर्जाचा कापूस ६ हजार ७०० रुपये भावाने विकावा लागला आहे. शासनाने ७ हजार ५०० रूपये हमीभाव दिला आहे. परंतु, त्यानुसर खरेदी होत नाही.
आता व्यापाऱ्यांची चांदी
सध्या शेतकऱ्यांचा कापूस ७ हजार रुपये भावाने खरेदी केला जात आहे. मागील महिन्यात हाच कापूस ६ हजार ५०० रुपये भावाने घेण्यात आला. आता निवडणुकाही संपल्या आहेत. तरी देखील कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. - वसंता अंभोरे, शेतकरी, जालना
मागील वर्षीच्या तुलनेत एक हजारांनी भाव कमी
दिवाळीनंतर कापसाला भाव मिळतो. परंतु, यंदा दिवाळी होऊन महिना उलटला तरीही भाव मिळाला नाही. निवडणुका संपल्यावर कापसाचे भाव वाढतील, असे वाटले होते. परंतु, त्यात कुठलीही भाववाढ झाली नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या तुलनेत एक हजार रुपयांपेक्षा कमी दराने कापूस विकावा लागणार आहे. - विजय साळवे, शेतकरी, जालना
यंदा उत्पादनात घट
१. गेल्या काही वर्षात कापसाचे उत्पादन घेणारे जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नाही. सध्या कपाशीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्या प्रमाणात उत्पादन होत नसल्याचे दिसून येत आहे.
२. कारण, खते, किटकनाशक आणि इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या हाती फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने कपाशीचे उत्पादन घटले आहे.
नव्या कापसाला यंदाही 'साडेसाती'
यंदाही खासगी बाजारात कापसाला अपेक्षित असे दर मिळत नाहीत. अगदी ६ हजार रुपये प्रति क्विंटल दराने लांब धाग्याच्या आणि एफएक्यू दर्जाच्या कापसाची खरेदी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. लांब धाग्याच्या कापसाला शासनाचे हमीभाव ७ हजार ५२१ रुपये प्रती क्विंटल असताना आता बाजारात ७ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे.बोंडअळी टपलेली, औषध महाग !
मागील काही वर्षापासून कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा सातत्याने प्रादुर्भाव होत आहे. या अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळीच कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. या औषधांच्या किमतीही आता आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
उसणवारी नील अन् शेतात कापूसही नील!
यंदा विविध नैसर्गिक आपत्तीने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. कृषीतज्ज्ञही ही बाब मान्य करीत आहेत. उत्पादन घटल्याने दुसऱ्या वेचणीतच उलंगवाडी झाली, तर अल्पदरामुळे उसणवारी कशीबशी शेतकऱ्यांनी उरकली.
खतांच्या गोण्यांनी कंबरडे मोडले !
कीटकनाशकांसह खताचे दरही मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यंदा खतांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला. किलोला १० रुपये देऊनही मजूर मिळेना कपाशीच्या वेचणीला सुरुवात होताच मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. शेतकऱ्यांनी वेचणीसाठी १० रुपये किलोचा दर देऊनही मजुर मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागत आहे.
बाजारात सध्या लांब धाग्याच्या कापसाला कमाल ७ हजार २०० रुपये दर मिळत आहे. तथापि, यंदा कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे पुढे कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे.- संजय गट्टाणी, कापूस व्यापारी, अनसिंग
खत, बियाणे आणि किटकनाशकाचे दर वाढले असून, मजुरांचाही तुटवडाही निर्माण झाला आहे. दहा रुपये किलो दरानेही वेचणीसाठी मजूर मिळत नसताना बाजारात दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खर्चही वसूल होत नाही. - सुरेश आसावा, कापूस उत्पादक शेतकरी, वाशिम
कापसाचा भाव अजून वाढणार का?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर ७ हजारापेक्षा कमी आहे. त्यामुळे भारतात कापसाला भाव मिळत नाही. तथापि, देशांतर्गत यंदा उत्पादनात घट झाल्याने कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.
पाच वर्षांत एकदाच १० हजारापुढे भाव !
वर्ष | भाव |
२०१९ | ५५०० |
२०२० | ६००० |
२०२१ | ६८०० |
२०२२ | १२००० |
२०२३ | ८९०० |
२०२४ | ७२०० |