Join us

Cotton Market Update :.....तर कापूस वापस करणार; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:56 IST

Cotton Market Update: कापूस खरेदीचे सॉफ्टवेअर बंद पडल्याने संपूर्ण देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या केंद्रावर आलेला कापूस ऑफ रेकॉर्डवर खरेदी काही अटींवर करण्यात आली. काय आहेत त्या अटी वाचा सविस्तर

कापूस खरेदीचे सॉफ्टवेअर बंद पडल्याने संपूर्ण देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत कापूस संकलन केंद्रावर (CCI) उभ्या असणाऱ्या वाहनांचे काटे करण्यात आले. 

ऑनलाइन (Online) संकेतस्थळ (Website) बंद असल्याने सीसीआय केंद्रावर त्याच्या ऑफ रेकॉर्डवर नोंदी घेण्यात आल्या. हा कापूस एका बाजूला ठेवण्यात आला आहे.

'सीसीआय'च्या सॉफ्टवेअरचा घोळ सलग दुसऱ्या दिवशी कायम होता. यामुळे सीसीआयचे कापूस खरेदी बंद राहिली. या केंद्रावर आलेला कापूस ऑफ रेकॉर्डवर खरेदी करण्यात आला. यासोबतच शेतकऱ्यांकडून या कापसाचे स्वयं घोषणापत्र लिहून घेण्यात आले. कापूस खरेदीच्या पावत्या मात्र थांबविण्यात आल्या आहेत.

बुधवारी (१२ फेब्रुवारी) रोजी खासगी कापूस संकलन केंद्रावर कापसाला ७ हजार २०० रुपये क्विंटलचा दर होता. हा दर मोजक्याच कापूस विक्रेत्यांना मिळाला. मात्र, इतर कापूस फरदडीच्या दरात व्यापाऱ्यांनी खरेदी केला. यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने या परिस्थितीचा फायदा खासगी व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. पडलेल्या दरात कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

...तर कापूस वापस करणार

* कापूस खरेदी केंद्रावर आलेला कापूस नियमात बसणारा नसेल, तर तो कापूस परत केला जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्या नंतर हा कापूस नियमात बसणारा होता का, हे कळणार आहे.

* ऑनलाइन सातबाऱ्यावर कापसाचा पेरा आणि प्रत्यक्षात या केंद्रावर आलेला त्या शेतकऱ्याचा कापूस किती होता, याची माहिती मिळणार आहे.

* हा कापूस अधिक असेल अथवा नोंदणी प्रक्रिया आणि आधारकार्ड (Aadhar card) यामध्ये गोंधळ असेल, तर हा कापूस परत जाणार आहे. तसे स्वयं घोषणापत्र लिहून घेण्यात आले आहे.

पुढील आदेशापर्यंत बंद

एका दिवसात कापूस खरेदी करणारे संकेत स्थळ दुरुस्त होईल, अशी अपेक्षा यंत्रणेला होती. मात्र, दोन दिवसांपासून हे संकेतस्थळ सुरूच करता आले नाही. यातून मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे सीसीआय केंद्राने पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी बंद राहील, असे पत्र काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market Update: कापुस उत्पादकांनो! सीसीआय खरेदी होणार पुन्हा सुरळीत वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड