यवतमाळ : सीसीआयची (CCI) कापूस खरेदी वारंवार बंद पडत आहे. याशिवाय अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी थेट खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस (Cotton) विक्रीसाठी प्रारंभ केला आहे.
या ठिकाणी दर कमी असले तरी आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून शेतकऱ्यांची वाहने खासगी व्यापाऱ्यांकडे वळली आहेत. या संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी सव्वा ६ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खुल्या बाजारात कापसाला ६ हजार ३०० ते ७ हजार २०० रुपये क्विंटलपर्यंतचे दर आहेत.
सीसीआयची कापूस खरेदी बंद होताच खासगी व्यापाऱ्यांनी पडलेल्या दरात कापूस खरेदी सुरू केली. याचा फटका कापूस उत्पादकांना सहन करावा लागत आहे. १० तालुक्यात शेतकऱ्यांकडे खासगी व्यापाऱ्यांची कापूस खरेदीसाठी धावाधाव पाहायला मिळत आहे.
चौथ्या दिवशीही सीसीआयचे सर्व्हर ठप्पच
मागील चार दिवसांपासून सीसीआयचे संकेत स्थळ ( WebSite) बंद आहे. या संकेत स्थळातील बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तज्ज्ञांना यात दुरुस्तीची किनारच गवसली नाही. आज (१४ फेब्रुवारी) रोजी हे संकेतस्थळ सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नगदी चुकाऱ्यासाठी द्यावी लागते टक्केवारी
कापूस खरेदी करताना नगदी चुकारे शेतकरी मागत आहेत. काही खासगी खरेदीदार नगदी चुकारे देताना दोन ते तीन टक्के पैसे घेतात.
जिल्ह्यात १०० वर खासगी व्यापाऱ्यांनी घेतेला कापूस
जिल्ह्यात १०० वर खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी केली आहे. हे १०० व्यापारी खुल्या बाजारात कापसाचे दर कमी असले तरी ६ लाख ३० हजार ३९९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात यशस्वी झाले आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडे जाणाऱ्या कापसाचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे.
यवतमाळ विभागात आठ लाख क्विंटल कापूस
जिल्ह्यातील यवतमाळ विभागात १० केंद्रांवर तब्बल ८ लाख ३७ हजार ४४५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १ लाख ९५ हजार क्विंटल कापूस घाटंजी केंद्रावर खरेदी झाला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market Update :.....तर कापूस वापस करणार; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर