Join us

Cotton Market : यवतमाळ जिल्ह्यात २२ हजार क्विंटल कापसाचे जिनिंग थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:12 IST

Cotton Market खुल्या बाजारात कापसाचे दर घसरताच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी थेट सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर प्रचंड गर्दी केली आहे. ही गर्दी अचानक ओव्हरलोड झाल्याने सीसीआयने सध्या खरेदी बंद ठेवली आहे.

यवतमाळ : खुल्या बाजारात Market कापसाचे दर घसरताच शेतकऱ्यांनी कापूस cotton विक्रीसाठी थेट सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर प्रचंड गर्दी केली आहे. ही गर्दी अचानक ओव्हरलोड झाल्याने सीसीआयचे cci कापूस खरेदीचे गणित कोलमडले आहे.

कापूस ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने सीसीआयने तीन केंद्रात कापूस खरेदी तूर्त बंद ठेवली आहे. यामुळे येत्या काळात कापूस खरेदी केंद्रावर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

यवतमाळमध्ये जैन कोटेक्स आणि जीनमाता कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदी केला जात आहे. या दोन्ही केंद्रात एका दिवसाला कापूस जिनिंग करण्याची क्षमता दीड हजार क्विंटलची आहे. अशा परिस्थितीत या केंद्रावर २२ हजार क्विंटल अतिरिक्त कापूस येऊन पडला आहे. यामुळे कापूस संकलनाचे गणित बिघडले आहे.

कापूस टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने यवतमाळात सीसीआयने २५ डिसेंबरपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच काळात पाच दिवसात याठिकाणी कापसाचे जिनिंग होणार आहे.

घाटंजी येथील सहा केंद्रावर दर दिवसाला कापूस विक्रीसाठी ४५० वाहनांची आवक आहे. या ठिकाणावरून साडेआठ हजार क्विंटल कापसाचे जिनिंग होत आहे. घाटंजीमध्ये शुक्रवारी कापूस खरेदी बंद करण्यात आली. शनिवारी आणि रविवारी कापूस संकलन बंद असणार आहे.

तर पांढरकवडा केंद्रातही शनिवारी आणि रविवारी कापूस संकलन बंद राहणार आहे. एकूणच तीन ही केंद्रावर कापूस खरेदी हाऊसफुल्ल झाली आहे. पुढील काळात याठिकाणी कापूस खरेदीसाठी अधिक गर्दी होणार आहे. खेडा खरेदीतून घेतलेला कापूसही व्यापारी आणत आहे.

सूचनेनंतरही रात्रीला पोहचतात गाड्या

* कापूस संकलन केंद्रावर दुपारी ४ नंतर वाहने आणू नये अशा सूचना आहेत.

* यानंतरही शेतकरी दररोज याठिकाणी कापूस विक्री करीता वाहन दाखल करत आहे. यातून कापूस खरेदी केंद्रावर प्रचंड रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

खुल्या बाजारात दर घटल्याने भीती

* यवतमाळ जिल्ह्यात कापूस संकलनाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या पावने पाच लाख हेक्टरवर कापसाची टोबनी झाली आहे. जागतिक बाजारात कापूस दरात प्रचंड मंदी आहे. पुढील काळात कापूस दर वाढण्याची शक्यता नाही.

* यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्री करीता काढला आहे. एकाचवेळी ठराविक केंद्रावर कापसाची गर्दी उसळली आहे. यातून कापूस खरेदी केंद्र ओव्हरलोड झाले आहे. या केंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक कापूस आल्याने जिनिंग प्रक्रियाच प्रभावित झाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : सीसीआय शेवटपर्यंत दर्जेदार कापूस खरेदी करणार; असा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डयवतमाळ