Join us

Cotton Market : सीसीआयने केली १८ लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:41 IST

खुल्या बाजारात कापसाला साडेसहा हजार रुपये क्विंटलचे दर आहेत. तर सीसीआयचे दर ७ हजार ५२१ रुपये क्विंटलचे दर आहे. यात क्विंटल मागे हजार रुपयाची तफावत असल्याने शेतकऱ्यांनी 'सीसीआय'कडे गर्दी केली आहे. (Cotton Market)

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : खुल्या बाजारात कापसाला साडेसहा हजार रुपये क्विंटलचे दर आहेत. तर सीसीआयचे दर ७ हजार ५२१ रुपये क्विंटलचे दर आहे. यात क्विंटल मागे हजार रुपयाची तफावत असल्याने शेतकऱ्यांनी 'सीसीआय'कडे गर्दी केली आहे. राज्यातील १२२ केंद्रावर १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. 

या केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. सध्याचे संकलन केंद्र अपुरे पडत आहेत. यातून शेतकऱ्यांनी कापूस खरेदीकरिता अतिरिक्त केंद्र उघडण्याची मागणी होत आहे.  त्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

जागतिक बाजारात कापसाचे दर घसरले आहेत. यामुळे खुल्या बाजारात सरासरी ६ हजार ५०० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे. यातून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आपला मोर्चा सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे वळविला आहे. 

मात्र हे केंद्र अपुरे असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. प्रत्येक केंद्रापुढे किमान ८० ते १०० वाहन कापूस विक्रीसाठी रांगेत उभे आहेत.राज्यभरात सीसीआयने १२२ केंद्रे आणि ३०० उपकेंद्रे उघडली आहेत. मुख्यतः ही केंद्रे तालुक्याच्या ठिकाणी आहेत. 

यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतमाल याच केंद्रावर येत आहे. एकच केंद्र असल्याने सर्व शेतकरी याच ठिकाणी एकाच वेळी धडकत आहेत. यातून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर मात करण्यासाठी अतिरिक्त केंद्र उघडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून झाली असली तरी आतापर्यंत त्यावर निर्णय झालेला नाही.

आमच्याकडे नियमाची पूर्तता करणारे केंद्र आले तर अशा ठिकाणी केंद्र वाढतील. यावर्षीची कापूस खरेदी आतापर्यंतची सर्वाधिक रेकॉर्डब्रेक खरेदी आहे. - ललीत गुप्ता, अध्यक्ष, प्रबंध निदेशक, सीसीआय

उन्हाचा चटका, दर न वाढण्याची स्थिती

कापूस राखून ठेवल्या नंतरही मागील तीन वर्षात कापसाचे दर वाढलेले नाहीत. उलट १५ डिसेंबर नंतर स्थिती दरवर्षी बिघडत गेली. यातच उन्हाचा चटका वाढला तर कापसाचे वजन कमी होते. शिवाय आर्थिक अडचणी आहेत. यातून शेतकऱ्यांनी कापूस विक्री करीता गर्दी केली आहे.

तरच उघडणार अतिरिक्त केंद्र

* सीसीआय जिनिंगची व्यवस्था असणाऱ्या आणि किमान दहा हजार कापूस गाठी बनतील अशा ठिकाणी केंद्र उघडणार आहे. ही मर्यादा पूर्ण करणाऱ्या ठिकाणी केंद्र उघडणार असल्याने सध्याची केंद्रे अपुरी आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड