नामदेव मोरेनवी मुंबई: श्रावण महिन्यासह नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवसांत तब्बल १६०० टन नारळाची विक्री झाली आहे.
होलसेल मार्केटमध्ये ३० ते ३५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ४० ते ५० रुपयांना नारळाची विक्री होत आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये १४६ टन आवक झाली होती.
मंगळवारी एकाच दिवशी विक्रमी ९२२ टन व बुधवारी ५३२ टन नारळाची आवक झाली. मागणी वाढल्यामुळे नारळाच्या दरामध्येही वाढ झाली आहे.
होलसेल मार्केटमध्ये एक महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांना विकला जाणारा नारळ आता ३० ते ३५ रुपयांवर पोहोचला आहे. तर किरकोळ मार्केटमध्येही दर ४० ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत.
दरम्यान, मागणी वाढल्यामुळे संपूर्ण श्रावण महिन्यात तेजी कायम राहील, असे नारळ व्यापारी संभाजी मुळीक यांनी सांगितले.
मुंबई बाजार समितीमध्ये कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात नारळाची आवक होते. होलसेल मार्केटमध्ये आकाराप्रमाणे नारळाची विक्री होत असते.
लहान व मध्यम आकाराचे नारळ धार्मिक कार्य व घरगुती वापरासाठी आणि मोठ्या आकाराचे नारळ हॉटेलसाठी वापरले जातात.
आठवड्यात दर तेजीतमुंबई, नवी मुंबईमधील हॉटेलचालकांकडून मोठ्या नारळाची खरेदी केली जाते. या नारळांच्या किमतीही होलसेल मार्केटमध्ये ३५ वरून ४५ वर पोहोचल्या आहेत. या आठवड्यात दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा: Bedana Market : यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले पण चोरट्या आयातीने गणित बिघडवले