वाशिम : कृषी क्षेत्रात सतत बदल होत असून, नवनवीन पिकांना अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. विशेषतः चिया बियांसारख्या (Chia Seeds) निर्यातक्षम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पिकांना वाशिमच्या बाजार समितीत मंगळवारी (११ फेब्रुवारी) रोजी खरेदीच्या पहिल्याच दिवशी २३ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला, ही चांगलीच बाब आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकांचे उत्पादन घेतले जाते. बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांचा प्रमुख आधार असलेल्या सोयाबीन पिकासाठी मात्र अद्याप ठोस धोरण तयार करण्यात आलेले दिसत नाही. त्यामुळे पारंपरिक पिकांना डावलले जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.
सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. हजारो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या या पिकाला वारंवार हमीभावापेक्षा कमी दर मिळतो, तसेच हवामानातील अनिश्चितता, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, पावसाच्या लहरी आणि शासनाच्या उदासीनतेमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. सोयाबीनच्या उत्पादनात होणाऱ्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सोयाबीनला देखील अपेक्षित दर मिळावेत, अशी मागणी आहे.
अत्यल्प दर चिंताजनक
* जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.
* जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. मात्र त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने जिल्ह्यातील सोयाबीनला बाजारपेठेत विकल्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध नाहीत. परिणामी अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे.
पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष का ?
शासनाने चियासारख्या नव्या पिकांना अनुदान व प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत. निर्यातीला मदत होईल, हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येते; परंतु पारंपरिक पिके असलेल्या सोयाबीन, तूर, हरभरा यासारख्या पिकांकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष का, असा सवालही उपस्थित होत आहे.
सोयाबीनचे पाच महिन्यांतील दर
महिना | किमान | कमाल |
फेब्रुवारी | ३४०० | ४०७५ |
जानेवारी | ३८९० | ४१५० |
डिसेंबर | ३८०० | ४२५५ |
नोव्हेंबर | ३६४० | ४४०० |
ऑक्टोबर | ३९५० | ४५८६ |
शासनाने फॅन्सी पिकांवर भर देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उपयोगी पिकांवर लक्ष द्यावे. सोयाबीनसारखे पीक लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक भविष्य ठरवते, त्यामुळे त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. - रामेश्वर नवघरे, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market: सीसीआयचे सर्व्हर 'बंद'; 'या' दिवशी सीसीआय खरेदीचे संकेत