युनूस नदाफ
भारत-पाक युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता; परंतु भारत-पाक युद्धविराम झाल्यानंतर केळीची निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. विदेशात केळीची निर्यात सुरुवात झाल्यामुळे केळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. विदेशांत जाणाऱ्या केळीला २४०० ते २४५० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. केळीच्या दरात वाढ झाल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका केळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील शेतकऱ्यांची पहिली आणि आर्थिक उत्पन्न देणारे पीक म्हणून केळी पिकाकडे बघितले जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे बहुतांश केळीचे पीक आहे. येथील केळी प्रदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. अर्धापुरी केळी खाण्यास गोड व चविष्ट आहे.
मागील आठवड्यात केळीच्या निर्यातीवर परिणाम झाला होता; परंतु या आठवड्यात इराक, इराण, ओमान, दुबई आदी आखाती देशांत निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. यामुळे केळीच्या दरात वाढ झाली आहे. देशांतर्गत दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड येथे पाठवली जात आहे. देशांतर्गत निर्यात होणाऱ्या केळीला १८०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
आंब्यापुढे केळीचा गोडवा कायम
सध्या आंबा हंगाम असून बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत; मात्र ग्राहकांची पहिली पसंती केळीलाच दिसून येते आहे. आंब्याच्या हंगामातही केळीला भाव टिकून आहे. अन्यथा आंबा हंगामात केळीच्या दरात मोठी घसरण होत असते.