नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची मुदत ३० ऑगस्टला संपुष्टात आली आहे. शासनाने संचालक मंडळाला मुदतवाढ न देता पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
पुढील सहा महिने प्रशासक कार्यरत राहणार आहेत. बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडीसाठी मार्च २०२० मध्ये निवडणूक झाली होती.
संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात आला आहे. यामुळे संचालक मंडळाला शासन मुदतवाढ देणार की प्रशासकाची नियुक्ती करणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
तीनपेक्षा जास्त राज्यांचा कृषीमाल विक्रीसाठी येणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देणे प्रस्तावित आहे. मुंबई बाजार समितीही राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.
बाजार समतीचे पुढील संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत किंवा सहा महिन्यांपर्यंत प्रशासकांकडे जबाबदारी असणार आहे.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर