Join us

नेपाळात नाशिकच्या कांद्याचे कौतुक; भारतातून तस्करीमुळे नेपाळी ग्राहकांना ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:52 PM

भारताच्या कांदा निर्यातबंदीनंतर किलो मागे २०० रुपयांहून अधिक असलेले नेपाळमधील कांदा बाजारभाव मागील दाराने भारतातून होणाऱ्या कांदा तस्करीमुळे एकदम निम्यापेक्षा जास्त खाली आले आहेत. सध्या ६५ ते ७० रुपये किलोने भारतीय कांदा नेपाळी ग्राहकांन मिळत असल्याने त्यांचे ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यात नाशिकच्या कांद्याचा हिस्सा जास्त असल्याने त्याचे कौतुक होताना दिसत आहे.

डिसेंबर महिन्यात भारताने कांदा निर्यातबंदी लागू केली आणि आपल्याकडील निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांची कांदा कोंडी झाली. मात्र त्यांनी चीन, पाकिस्तान, इजिप्त यांसारख्या देशांतून कांदा आयात करून आपल्याकडची गरज भागवली. त्यात आपल्या शेजारी असलेल्या नेपाळचाही समावेश होता. मात्र चीनचा कांदा भारतीय कांद्याच्या तुलनेत कमी तिखट व बेचव असल्याने त्याला नेपाळमध्ये उठाव मिळाला नाही. परिणामी या देशातील कांद्याचे दर चढेच राहिले.

मात्र आता भारतातून कांदा तस्करीनंतर या किंमती निम्म्याहून घसरल्या असून सर्वसामान्य नेपाळी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या येथील ग्राहकांना २०० रुपयांऐवजी केवळ ६५ ते ७० रुपये एक किलो कांद्यासाठी मोजावे लागत आहेत. दरम्यान नेपाळमधील व्यापाऱ्यांनी त्यांच्या भारतीय ओळखीच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार लवकरच भारत सरकार कांदा निर्यातबंदी हटविण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील कांदा आणखी स्वस्त होऊ शकतो.

कांदा निर्यातीत जगातील आघाडीचा देश असलेल्या भारताने निर्यातबंदी केल्यामुळे त्याचा परिणाम शेजारील देशांसह आशियातील अनेक देशांवर झाला. कारण त्यांच्याकडे कांदा टंचाई निर्माण झाली व त्याचा परिणाम भाव वाढण्यात झाले. शेजारी देश असलेला नेपाळवरही कांदा निर्यातबंदीचे परिणाम होऊन किरकोळ बाजारात तेथील कांदा बाजारभाव दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नेपाळने चीनचा कांदा आयात केला. पण त्याच्याकडे तेथील ग्राहकांनी पाठ फिरवली.

हेही वाचा : भारतातून रोज होतेय १८०० टन कांद्याची तस्करी

दरम्यान नेपाळमधील आघाडीचे दैनिक काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार भारतातून कांदा नेपाळात येऊ लागल्यापासून तेथील कांद्याचे भाव कमी होत असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नेपाळमध्ये होलसेल बाजारात कांदा ७५ ते ८० रुपये किलोने विकला जात होता, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलो प्रमाणे विकला जात होता. आता हे दर ६५ रुपयांपर्यंत घसरले आहेत.  मागच्या आर्थिक वर्षात नेपाळने भारतातून १ लाख २० हजार १९० टन कांदा आयात केला. 

नेपाळमधील कालीमाटी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी ‘काठमांडू पोस्ट’ ला दिलेल्या माहितीनुसार या बाजारात सध्या दररोज ७५ ते ८० टन कांदा भारतातून आयात होत आहे. दरम्यान भारतातून हा कांदा कसा आयात होतो? या बद्दल नेपाळच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत. तर तेथील कांदा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या ओळखीत असलेल्या भारतीय व्यापाऱ्यांकडून कांदा आयात करत असून भारतीय अधिका्ऱ्यांकडून हा कांदा नेपाळात आणण्यासाठी कोणतीही अडवणूक होत नाही.  विशेष म्हणजे कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच भारतातून तस्करीने कांदा नेपाळमध्ये जाऊ लागला आहे. या तस्करी होणाऱ्या कांद्यात नाशिकच्या कांद्याचा मोठा हिस्सा आहे. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी नेपाळमध्ये गेले असताना त्यांना तेथील व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली.

भारतातील कांदा निर्यातबंदी हटणार?भारताने ८ डिसेंबर ते ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यातबंदी केल्याने येथील शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव २०० ते हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पडले आहेत. निर्यातबंदी आधी हेच दर साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होतें. पण लवकरच भारत सरकार ही निर्यातबंदी हटवू शकतील असा कयास नेपाळमधील व्यापाऱ्यांनी लावला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे भारताचे संपर्क वापरले असून भारतीय कांद्याची निर्यातबंदी हटली, तर नेपाळमधील कांदा आणखी स्वस्त होईल अशी आशाही त्यांना आहे.

टॅग्स :कांदानेपाळशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती