Join us
Daily Top 2Weekly Top 5

तण नाशकांमुळे उत्पन्नात घट

By बिभिषण बागल | Updated: August 23, 2023 13:29 IST

मोल मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे आणि वेळेला मजूर न मिळणे आदी समस्यांच्या गराड्यात परिणामी शेतकरी तणांचे नियंत्रण ठेवण्यासाठी तण नाशकांची फवारणी घेतात.

जगाचा पोशिंदा म्हणून बिरुद मिरवले जाते त्या शेतकऱ्यांची आजची परिस्थिती मात्र बिकट होत चालली आहे. काही पिकांतुन अपेक्षित उत्पन्न मिळते तर कधी कधी जेमतेम खर्चाची भरपाई होत असते अशा परिस्थितीत दोन पैसे अधिकचे मिळावे या आणि अशा अपेक्षेपाई शेतकरी पारंपरिक शेती सोडून झटपट आणि कमी मेहनतीचे पिके घेतांना दिसून येत आहे मात्र या सर्वांमध्ये ज्या मातीतून शेतीतून आपण हे पिके पिकवितो ती माती आणि त्या मातीचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होतांना दिसत आहे. 

मोल मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे आणि वेळेला मजूर न मिळणे आदी समस्यांच्या गराड्यात परिणामी शेतकरी तणांचे नियंत्रण ठेवण्यासाठी तण नाशकांची फवारणी घेतात. ज्यामुळे जमिनीपासून वरती आलेले तण जळून जातात मात्र काळांतराने जमिनीत असलेली त्या तणांची मुळे पुन्हा नव्याने उगवतात तसेच या तण नाशकांच्या फवारणीमुळे शेत जमिनींचा पोत खराब होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न कमी होणे, पिकांची वाढ न होणे तसेच पिकांची उगवण क्षमता असतांना हि त्यांची योग्य अशी उगवण न होणे आदी परिणाम हे विविध तण नाशकांच्या सततच्या फवारणीमुळे दिसून येत असल्याचे शेतकरी बोलत आहे.

रविंद्र शिऊरकर

शेतातील तण कमी करण्यासाठी तणनाशकाचा सध्या वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे यामध्ये प्रामुख्याने ग्लायफोसेट, २.४ डी किंवा विविध कंपनीच्या पिकनिहाय निवडक तणनाशकांचा वापर होत आहे. ही तणनाशके मातीमध्ये काही महिने, काही वर्षे तशीच पडून राहतात. यामुळे पुढच्या खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये पिकाच्या उगवण क्षमतेत मध्ये फरक पडतो याचा परिणाम उत्पन्नावर होतो तसेच मातीतील अनेक सूक्ष्मजीव जिवाणूची व गांडूळ सारख्या मित्र जिवांची संख्या कमी होते ज्यातून मातीची सुपीकता कमी होते. या तणनाशकाच्या वापरामुळे माती पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य यांचं आरोग्य व विविध हॉर्मोनल रोग, तसेच कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तणनाशके वरदान कि शाप या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. - केदार बाळासाहेब मुळे (जैवतंत्रज्ञान अभ्यासक, औरंगाबाद)

मी दरवर्षी ऊसाची शेती करतो ज्यामध्ये वेळोवेळी तण नियंत्रण करण्यासाठी आम्ही त्या त्या परिस्थिती जर मजूर उपलब्ध झाले नाहीत तर तण नाशकांची फवारणी करतो मात्र यामुळे त्या जागेवर नवीन पीक घेतल्यावर उत्पन्न कमी मिळणे तसेच पुढील पिकांत अधिक जोमाने तणांचा सामना करावा लागतो. - गणेश बाजीराव ताठे (शेतकरी, रा. वाघला, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) 

आमचे खरिपात मक्का हे मुख्य असून त्यानंतर कांद्याचं पीक आम्ही दरवर्षी घेतो मक्का पिकांत एक वर्षी आम्ही तण नाशकांची फवारणी केली होती ज्यातुन तण नियंत्रित झाले मात्र कांद्याच्या वेळेस ते तण खूप अधिक प्रमाणात दिसून आले ज्यामुळे आता मजुरांच्या मदतीनेचं आम्ही तणांचे नियंत्रण करतो. - नवनाथ मगर (शेतकरी, रा. कोल्ही, ता. वैजापूर, जि औरंगाबाद)

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन