Join us

Women Farmer : डॉक्टर महिलेने केले शेतीचे नंदनवन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:58 IST

Women Farmer : पेरणीयोग्य नसलेल्या शेतीचे नंदनवन करून पारंपरिक पिकांना फाटा देत अकोट तालुक्यातील दिवठाणा येथील शेतकरी महिलेने वायगाव हळदीची लागवड केली. हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. वाचा सविस्तर

अकोट : पेरणीयोग्य नसलेल्या शेतीचे नंदनवन करून पारंपरिक पिकांना फाटा देत अकोट तालुक्यातील दिवठाणा येथील शेतकरी महिलेने वायगाव हळदीची (Vaigaon Turmeric) लागवड (Cultivation) केली. हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

डॉ. पुष्पा साहेबराव वालसिंगे असे महिला शेतकऱ्याचे नाव आहे. अकोट तालुक्यात कपाशी व सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त असते; परंतु पीक घरात येताच भाव पडत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक अस्वस्थता वाढते.

अकोट तालुक्यातील शेतकरी महिलेने शेती आणि मातीशी नाळ जुळवत अकोटवरून १० किमी अंतरावर असलेल्या दिवठाणा येथील ६ एकरांच्या शेतात 'फाइव्ह लेअर फार्मिंग कन्सेप्ट' राबविला आहे. यातून त्या वर्षातून शेतात पाच पिके घेत आहे. याकरिता त्यांनी शेतात गाळ टाकला.

प्रारंभी शेती ठोक्याने लागवडीसाठी दिली. त्यानंतर पारंपरिक पिकावर येणाऱ्या संकटावर मार्ग काढत स्वतः शेती करण्यासाठी सरसावल्या. त्यांनी त्यांच्या आईकडून शेती संगोपनाचे धडे गिरवले.

त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. स्वतः योगा व आहारतज्ज्ञ असल्याने दुर्मिळ भाज्या, फळांची लागवड केली.

भाजीपाल्यासह फळपिकांची लागवड

शेतकरी महिलेने शेतात भाजीपाला, रामफळ, मोसंबी, हेटाफूल, फणस, चिकू, आंबा, रानभाज्या, वावडिंग, पांढरी कारले, फांदीची भाजी, शेवग्याच्या पानांची भाजी, विविध रसाळ फळे नैसर्गिक पद्धतीने पीकविण्याचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत.

विदेशातील नातलगांपर्यंत पोहोचले शेतातील धान्य

• अकोट येथील अन्नधान्याचा साठा केवळ तालुक्यात नव्हे, तर अकोला, अमरावती व विदेशातील नातलगांपर्यंत जात आहे. शेतीतून आरोग्यदायी जीवन मिळावे, यासाठी त्यांनी सहा एकरांत चार गडी माणसे, दोन वीजपुरवठ्याचे कनेक्शन घेतले आहेत.

● कर्फ्यूमिन हळदीच्या आरोग्यदायी प्रकल्पाचे अनेक फायदे समजून सांगत कोरोना काळात कोविड सेंटरवर सेंद्रिय वनस्पतीचा मोफत पुरवठा केला. त्याची शेती या परिसरातील महिलांच्या आदर्श ठरत आहे.

■ विविध राज्यांतून झाडाची रोपे, बियाणे आणून लागवड केली. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी वायगावची हळदीचा प्रयोग सुरू केला.

■ या सुपीक जमिनीवर ही हळद बहरली आहे, त्यांचे प्रयोग पाहण्यासाठी केवळ शेतकरीच नव्हे, तर अत्याधुनिक शेती करणारे शास्त्रज्ञदेखील भेटी देतात.हे ही वाचा सविस्तर : Mushroom Farming : मशरूम शेतीतून बाबूरावांना मिळाले लाखोंचे उत्पन्न कसे ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिलाअकोट