Join us

राज्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या 'या' प्रमुख मागण्या मान्य होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:26 IST

bedana market शेतकऱ्यांच्या बेदाण्यास हमीभाव मिळावा, बेदाण्यावरील स्टोरेज भाड्यावरील जीएसटी माफ करावा, द्राक्ष पिकास कमी खर्चात १२ महिन्यांसाठी विम्याची तरतूद करावी.

कुर्डूवाडी : शेतकऱ्यांच्या बेदाण्यास हमीभाव मिळावा, बेदाण्यावरील स्टोरेज भाड्यावरील जीएसटी माफ करावा, द्राक्ष पिकास कमी खर्चात १२ महिन्यांसाठी विम्याची तरतूद करावी.

शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा, नेपाळमार्गे बेकायदेशीर भारतात आयात होणाऱ्या चीनच्या बेदाण्यावर बंदी आणावी आणि बेकायदा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.

अशा विविध मागण्यांसाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार, २९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. कृषिनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा झाली.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, लालासाहेब गव्हाणे, रमेश भोईटे, बालाजी गव्हाणे, योगेश जाधव, सोनू पवार, मदन गव्हाणे, काकासाहेब सारोळे, शेखर खंडागळे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळाच्या वतीने अफगाणिस्तानमधून येणाऱ्या बेदाण्याला आयात कर लावा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कायदा करावा.

बेकायदेशीर आयात बेदाणा जप्त करावा, बेदाण्यावरील आयात कर वाढवून निर्यात कर कमी करावा, अशाही मागण्या करण्यात आल्या. संपूर्ण मागण्या ऐकून घेत सकारात्मक कार्यवाही करत असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले.

चार लाख हेक्टरवर द्राक्ष उत्पादनराज्यात सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्रावर विविध वाणांचे द्राक्ष उत्पादन होत असून, त्यातून ७१ टक्के मार्केटिंग, २७ टक्के बेदाणा, १.५ टक्के वाइन, तर ०.५ टक्के ज्यूस निर्माण होतो. विविध कारणामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.

अधिक वाचा: आता हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; २५ हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसणार

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेतीपीकपीक विमाबाजारचीनदेवेंद्र फडणवीस