Join us

दुष्काळी पट्टयातील रानमेवा करतोय हळूहळू बाजारपेठ काबीज; माडग्याळ बोरांची पुणे, मुंबईकरांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:30 IST

Madgyal Bor : आजपर्यंत जतच्या केवळ दुष्काळी पट्टयातील रानमेवा म्हणून परिचित असलेल्या माडग्याळी बोरांनी आता हळूहळू बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली आहे. या माडग्याळ देशी बोरांची पुणे, मुंबईच्या खवय्यांना भुरळ घातली आहे. या भागातील शेतकऱ्यांनीही आता माडग्याळी बोरांची (Madgyal Jujube) लागवड करायला सुरूवात केल्याचे दिसत आहे.

दीपक माळी

माडग्याळ : आजपर्यंत जतच्या केवळ दुष्काळी पट्टयातील रानमेवा म्हणून परिचित असलेल्या माडग्याळी बोरांनी आता हळूहळू बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली आहे. या माडग्याळ देशी बोरांची पुणे, मुंबईच्या खवय्यांना भुरळ घातली आहे. या भागातील शेतकऱ्यांनीही आता माडग्याळी बोरांची लागवड करायला सुरूवात केल्याचे दिसत आहे.

जत तालुक्यातील माडग्याळ, व्हसपेठ, सोन्याळ, आसंगी, अंकलगी या भागात बोरांची ही परंपरागत देशी झाडे आढळतात. ही झाडे नैसर्गिकरीत्या उगवून येतात. या भागातील प्रत्येक शेताच्या बांधावर किमान २५ ते ३० बोरांची झाडे हमखास आढळून येतात. अनेक शेतकऱ्यांनी ती प्रयत्नपूर्वक जतन करून ठेवलेली दिसून येतात. माडग्याळ व परिसरात बोरांच्या एका झाडाला सरासरी शंभर ते पाचशे किलो बोरे मिळतात. ही बोरे चवीला आंबट गोड, आकाराने जांभळाएवढी व निमूळती असतात. कोणत्याही वातावणात टिकून राहण्याची या झाडांची क्षमता असते. पाण्याचीही फारशी अपेक्षा नसते.

जत तालुक्यातील माडग्याळ हे गाव देशी शेळ्या, माडग्याळ मेंढी यासाठी महाराष्ट्रात प्रसिध्द आहेच. त्याचबरोबर इतर राज्यातही आपला आगळावेगळा देशीपणा टिकवत आपले वर्चस्व निर्माण केले आहेच. मग ते देशी मटकी असेल, धान्य, कडधान्य असतील किंवा भाजीपाला असेल तर सेंद्रिय खतावरच उत्पादन घेतले जात आहे. आता याच मातीतील माडग्याळ बोरांनाही महाराष्ट्रात मागणी वाढली आहे.

माडग्याळची बोरं आता पुणे, मुंबईच्या बाजारपेठांमध्ये पोहोचली आहेत. माडग्याळच्या बोरांनी आपला वेगळाच बॅण्ड निर्माण केला असून, कृषी विभागाने पुढाकार घेतल्यास यालाही चांगले दिवस येतील. माडग्याळ गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर बोरांची काही मोजकी झाडे लावली आहेत. कोणत्याही परिस्थितीत किंवा एखाद्या गावात पावसावर ही झाडे जगतात.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

बोरांचा हंगाम सुरू

ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत संक्रांतीच्या दिवसांपर्यंत हा बोरांचा हंगाम असतो. चवीला आंबट गोड असणाऱ्या या बोरांना बाजारपेठेत मोठी मागणी असते.

लाखांपर्यंतचे उत्पन्न

सध्या या बोरांना प्रतिकिलो ८० ते ९० रुपये इतका दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात पन्नास ते एक लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. यासह माडग्याळच्या बोराची चव राज्यातील इतर कोणत्याही बोरांपेक्षा सरस आहे. बाजारात इतर जातीची बोरे उपलब्ध असली तरी खास आवर्जून माडग्याळ बोरांची मागणी होत असते.

...या ठिकाणी मागणी

जत तालुक्यासह सांगली, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मंगळवेढा, पंढरपूर, कर्नाटकातील विजापूर, अथणी, जमखंडी आदी ठिकाणी ही बोरं विक्रीसाठी पाठवली जातात.

माडग्याळ बोरांसाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. शेतकरी मोजक्याच झाडांवर बोरांचे उत्पादन घेऊन, शेतकरी ते ग्राहक असा प्रवास करतात. माडग्याळची बोरं पुणे, मुंबईपर्यंत जात आहेत. शासनाने याकडे लक्ष दिल्यास ही विशिष्ट माडग्याळ देशी बोरांची प्रजाती वाढविण्यास मदत होऊ शकेल. - शशिकांत माळी, प्रगतशील शेतकरी, माडग्याळ.

हेही वाचा : Save Soil Health : करूया राखण पोषक घटकांच्या मातीची; हमी मिळेल, सुरक्षित अन्न धान्यांसह भरभराटीच्या पिकांची

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती