माती परीक्षण ही आधुनिक आणि शाश्वत शेतीची पहिली पायरी आहे. जमिनीच्या गुणधर्मांची योग्य माहिती घेतल्यास योग्य पिकांची निवड करता येते, आणि उत्पादनात निश्चितच वाढ होते. म्हणून, प्रत्येक शेतकऱ्याने दर २-३ वर्षांनी आपल्या शेताची माती तपासून घ्यावी आणि त्यानुसार पिकांचे नियोजन करावे.
रासायनिक खते, कीटकनाशकांचा आतिव वापर, पाण्याचा अपव्यय आणि सतत एकाच पिकाचे उत्पादन या कारणांमुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत असून पर्यायाने दिवसेंदिवस शेतजमीन नापीक होत चालली आहे. जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी रासायनिक वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे.
तसेच आपल्या शेतीला काय हवे आहे. हे तपासण्यासाठी माती परीक्षणही तितकेच गरजेचे आहे, माती परीक्षणात जमिनीतील पोषणद्रव्यांची (जसे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, इ.) आणि इतर गुणधर्माची तपासणी होते. यामध्ये मातीचा पीएच, सेंद्रिय घटकांचे प्रमाण, सूक्ष्म अवयवांचे प्रमाण आदी गोष्टींची माहिती मिळते.
यामुळे पिकांसाठी कोणती खते, किती प्रमाणात आणि केव्हा वापरावीत हे ठरवता येते, अयोग्य आणि अनावश्यक खतांचा वापर टाळता येतो, जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते, अतिरिक्त रसायनांचा वापर टाळल्याने पाण्याचे व जमिनीचे प्रदूषण कमी होते, जैविक खतांचा योग्य वापर करता येतो.
यामुळे पर्यावरणपूरक शेती शक्य होते, मातीच्या गुणधर्मावर आधारित पीक निवड करता आल्यास उत्पादनात सातत्य येते, मातीचा पोत आणि ओलाव्याची क्षमता कळल्यामुळे सिंचन व्यवस्थापन सुधारते. असे अनेक फायदे शेतकऱ्यांना माती परीक्षणातून होतात. पीक काढण्यासाठी शेतीत लाखो रुपयांची गुंतवणूक करणारे आपले शेतकरी मात्र, अपवाद वगळता माती परीक्षणाच्या भानगडीत पडत नाहीत.
असे करावे माती परीक्षण
• शेतीतील मातीचे परीक्षण करण्यासाठी, शेतातील वेगवेगळ्या भागातून मातीचे नमुने घेणे आवश्यक आहे. यासाठी शेताला योग्य विभागांमध्ये विभाजित
• प्रत्येक विभागात पाच ते दहा ठिकाणी मातीचे नमुने घ्या. यासाठी ६ ते ८ इंच खोलीपर्यंत मातीचा नमुना घ्यावा, सर्व नमुने एकत्र करून, एका स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा आणि व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर हे नमूने प्रयोगशाळेत पाठवा.
मृदा परीक्षणातून पर्यावरणाचे संरक्षण
• माती परीक्षण हा आधुनिक शेतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आरोग्याची अचूक माहिती मिळते.
• या माहितीच्या आधारे घेतलेले निर्णय केवळ उत्पादन वाढीसाठीच नव्हे, तर जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी देखील महत्त्वाचे ठरतात.
सुखदेव जमधडेसंस्थापक, तिफन फाउंडेशन अहिल्यानगर.