Join us

पाऊस कमी झाल्याने वैजापूर तालुक्यात गव्हाचे क्षेत्र घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:30 IST

आतापर्यंत फक्त २५ टक्के जमिनीवर पेरणी; दरामध्ये वाढ होण्याची शक्यता

वैजापूर तालुक्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने गव्हाच्या लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे, अशी महिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तालुक्यात आतापर्यंत फक्त २५ टक्के क्षेत्रावरच गव्हाची पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव म्हणाले, वैजापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ५४ हजार हेक्टर असून, त्यापैकी १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. यातील ५ हजार २८५ हेक्टर क्षेत्र रब्बी ज्वारीचे असून, वैजापूरसह खंडाळा, जानेफळ, लोणी बुद्रुक, शिऊर, गारज, लासुरगाव, बोरसर, महालगाव, नागमठाण, घायगाव व बाबतरा या १२ महसूल मंडळात ५५ टक्के क्षेत्रात ज्वारीची पेरणी झाली आहे.

गव्हाचे क्षेत्र ६ हजार ६१३ हेक्टर असून, त्यापैकी केवळ २५ टक्के पेरणी झाली आहे. तालुक्यात पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जलसाठे भरलेले नसून सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याअभावी अपवाद वगळता बहुतांश मंडळात गव्हाची पेरणी कमी आहे. हरभराची पेरणीही रब्बी हंगामात होत असते. यंदा ६ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ टक्के क्षेत्र हरभरा या पिकाने व्यापले आहे.

मका  पिकाची लागवड वाढली

  • शेतकऱ्यांनी जादा भाव मिळण्याच्या आशेने मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून, सर्व मंडळांत मिळून ८१६ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड केली आहे. मकाचे सरासरी क्षेत्र ४३० हेक्टर आहे. 
  • याशिवाय शेतकऱ्यांनी कांदा पेरणीही सुरू केली आहे. लाल कांदा किंवा रांगडा कांदा काढल्यानंतर साधारणपणे डिसेंबर, जानेवारी महिन्यात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा व मका या दोन्ही पिकांना भाव मिळण्याची अपेक्षा असल्याने दोन्ही हंगामांत ही पिके घेतली जात आहेत 
टॅग्स :गहूपाऊसवैजापूर